आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Seeing Dream Of Prime Minister Post Naredra Modi

पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत नाही; जो पाहतो तो संपून जातो - नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/नवी दिल्ली - ‘पंतप्रधानपदाचे स्वप्न मी पाहत नाही. जो कुणी हे स्वप्न पाहतो तो नामशेष होतो’ हे उद्गार आहेत गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपमधील पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार नरेंद्र मोदी यांचे. केवळ स्वप्न पाहत बसण्यापेक्षा ठोस कार्य करण्यावरच आपला विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेसनेही तत्काळ प्रतिक्रिया दिली. बनावट चकमकीचा आरोप असलेले माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी केलेल्या भंडाफोडीनंतर मोदींना उपरती झाली असल्याची टीका काँग्रेसने केली.

शिक्षकदिनानिमित्त आयोजित एका समारंभात विद्यार्थ्याने मोदींना प्रश्न विचारला, ‘पुढील वर्षी पंतप्रधान झाल्यावरही आपण आमच्याशी गप्पा मारायला येणार का?’ यावर मोदी म्हणाले, पंतप्रधानपदाचे स्वप्न मी पाहत नाही. गुजरातच्या जनतेने 2017 पर्यंत मला जबाबदारी दिली आहे.


जारांच्या भंडाफोडीनंतर मोदींना उपरती झाली!
मोदींचे हे वक्तव्य प्रसिद्ध होताच काँग्रेस खासदार जगदंबिका पाल, केंद्रीय मंत्री हरीश रावत, रेणुका चौधरी, पी. एल. पुनिया ही मंडळी एकामागे एक मोदींवर तुटून पडली. पाल म्हणाले, ‘आपण पंतप्रधान होऊ शकणार नाही हे त्यांना माहीत असल्याने अगोदरच त्यांनी हार पत्करली.’ पक्षांतर्गत विरोधामुळे मोदींचे डोळे उघडल्याचे रावत म्हणाले. पी. एल. पुनिया यांनी या वक्तव्याचा संबंध थेट बनावट चकमकप्रकरणी अटकेत असलेले माजी आयपीएस डी. जी. वंजारा यांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपांशी जोडला. आपले खरे रूप जनतेसमोर आल्याने मोदींना उपरती झाल्याचे ते म्हणाले.


वक्तव्याचे महत्त्व काय?
राजकीय टीकाकारांच्या मते, मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत असे मानणे चुकीचे ठरेल. वास्तविक त्यांच्या वक्तव्यात दोन अर्थ दडले आहेत. पहिला : जो हे स्वप्न पाहतो तो संपून जातो, असे मोदी म्हणतात. अडवाणींना त्यांचा हा टोला आहे. दुसरा : मोदींचे नाव समोर येताच काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांना हे उत्तर आहे. ‘मी दावेदारी सांगणार नाही. पक्षाला वाटत असेल तर नाव जाहीर करावे,’ असा संदेश देण्याचा प्रयत्न.