आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये आता ‘बॉर्डर टुरिझम’ची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालनपूर (गुजरात) - गुजरातमध्ये तुम्हाला पर्यटनाचा एक वेगळा प्रकार अनुभवता येणार आहे. मध्य गुजरातमधील कांठा जिल्ह्यात असलेल्या भारत - पाक आंतरराष्‍ट्रीय सीमेवर पर्यटकांना परवानगी देण्यात येणार आहे. या ठिकाणी सुईगामा बॉर्डर क्षेत्रात वॉचिंग पॉइंट, सनसेट पॉइंट तसेच दृक्श्राव्य माध्यमातून सैन्याची माहिती तसेच युद्धकाळातील परिस्थितीची माहिती देण्याची योजना राज्याच्या पर्यटन विभागाने तयार केली आहे. त्यासाठी या ठिकाणी मिनी थिएटर, हॉटेल, कॉन्फरन्स हॉल, या भागात पर्यटकांच्या सोयीसाठी हॉटेल व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

सीमा सुरक्षा दलासोबत (बीएसएफ) मिळून ही योजना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. सुईगामा येथून सूर्यास्त खूप रमणीय दिसतो. थेट सीमेपर्यंत जाण्याची संधी मिळत असल्याने पर्यटक याकडे आकर्षित होऊ शकतात. त्यादृष्टीने हा भाग चिन्हांकित करण्यात आला असून तो ‘गोल्डन रण’च्या स्वरूपात विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भाग आर्थिकदृष्ट्या मागास असून त्या ठिकाणी ‘इको टुरिझम’ संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पावसाळ्यात या भागात भरपूर पाऊस, पाणी असते.

हिवाळ्यात येथील पाणथळ भाग विदेशी पक्ष्यांना आकर्षित करतो. विविध जातींचे पक्षी येथे येतात. ही बाब लक्षात घेऊन त्याचा उपयोग पर्यटन व्यवसायासाठी केला जाणार आहे. पर्यटकांना पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेता यावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी बर्ड वॉचिंग पॉइंट, सनसेट पॉइंट, कच्छच्या खावडा - धोरडो सीमारेषेच्या धर्तीवर वातानुकूलित तसेच साध्या खोल्या, कॉन्फरन्स रूम, हॉटेल, जलतरण तलाव आदी सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सैनिकांच्या दैनंदिन निगराणी कार्यक्रमात अडथळे न येता त्या भागात पर्यटक वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली.