आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता गुजरातेत 125 जागांचे लक्ष्य, काँग्रेस आमदारांच्या मेळाव्यात खा. अहमद पटेल यांचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत विजयश्री खेचून आणली. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांत जोश संचारला आहे, असे पटेल म्हणाले. आता गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीत १२५ जागा जिंकण्याचे ध्येय आहे, असे उद््गार काँग्रेसचे राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार अहमद पटेल यांनी काढले.  

अहमद पटेल काँग्रेस पक्षातील वजनदार नेते असून सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आहेत. आतापर्यंत लढलेल्या निवडणुकांमध्ये गुजरातेतील राज्यसभा निवडणूक जिंकणे खरोखरच अवघड होते, हे त्यांनी मान्य केले.  काँग्रेस पक्षातून आलेले बलवंतसिंग राजपूत हे भाजपपुरस्कृत उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस पक्षाचे आमदार फोडाफोडीचे राजकारण चालू असताना बलवंतसिंग यांनी अहमद पटेल यांना कडवी लढत दिली. त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे विजयाचे पारडे कधी अहमद पटेल यांच्या बाजूने तर कधी बलवंतसिंग यांच्या बाजूने झुकत होते.अखेर त्यांनी बलवंतसिंग यांना पराभूत करून काँग्रेसकडे राज्यसभेची जागा खेचून आणली.  

अहमद पटेल यांच्या विजयानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांच्या विजयाचे ढोलताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून विजयोत्सव साजरा केला.  

आयुष्यातील सर्वात अवघड निवडणूक
माझ्या आजवरच्या राजकीय आयुष्यातील राज्यसभेची ही निवडणूक सर्वात अवघड होती. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदारांचे मनापासून आभार मानतो, असे उद््गार अहमद पटेल यांनी काढले. गांधीनगर काँग्रेस आमदारांच्या मेळाव्यात  ते बोलत होते. काँग्रेस आमदारांना भाजपच्या वतीने अनेक प्रलोभने दाखवण्यात आली, असे नेत्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
या विजयाने पक्षात उत्साहाचे वातावरण पसरले असून कार्यकर्त्यात नवा जोश संचारला आहे. आता या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १२५ आमदार निवडून आणण्याचे एकमेव ध्येय उराशी बाळगले आहे, असे अहमद पटेल यांनी जाहीर केले. या बैठकीस काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.  
बातम्या आणखी आहेत...