आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : हिरे कारखान्यात भजे तळले, नोकरीवर पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - खमंग भज्यांचास्वादाने हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या कौशल्यावरही भुरळ घातली आणि हिऱ्यांना नवी झळाळी देणाऱ्या किमयागार हातांवर रोजी-रोटीचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
प्रकरण हिरानगरी सुरतचे आहे. रामदेव हिरा कारखान्यात काम करणाऱ्या सहा तरुणांची चूक एवढीच की कामाच्या वेळेत ते भजी तळत होते. व्यवस्थापकाला ते कळले आणि त्याने या सहा जणांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. भज्यांच्या नादात हातची नोकरी तर गेलीच, परंतु व्यवस्थापकाने त्यांच्या पगारातून पाच- पाच हजार रुपयेही कापून घेतले.

घटना दोन आठवड्यांपूर्वीची आहे. पण ती आता समोर आली आहे. हिऱ्याला पॉलिश करण्याचे काम करणारे कौशिक, नयन, सागर, हिरेन, कौशल आणि किरीट पटेल यांनी एकेदिवशी भजी तळण्याचे सामान कारखान्यात आणले. कारखान्यातच बॉयलर रूम आहे. तेथे हिरे तापवण्यासाठी स्टोव्ह आणि काही भांडीही असतात. काम करता करता थकवा आला म्हणून चला थोडा नाष्टा करू, असा विचार त्यांच्या मनात आला आणि ते बॉयलर रूममध्ये भजी तळू लागले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पकडला. व्यवस्थापकाने व्हिडिओ पाहिला आणि मालकांशी बोलून त्याने या सहा जणांना नोकरीवरून काढून टाकले. हे सहाही तरुण पदवी अभ्यासक्रमाला शिकत आहेत. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे गेल्या एक वर्षभरापासून ते येथे अर्धवेळ काम करत होते. नोकरीवरून काढून टाकलेला नयन पांडव सांगतो की, आम्ही अत्यंत गरीब घरचे आहोत. व्यवस्थापकाला सांगता आम्ही भजी तळली, एवढीच आमची चूक झाली. आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. माफीही मागितली, परंतु त्यांनी आमचे काहीएक ऐकून घेतले नाही. आमचे आईवडील आमच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत म्हणून आम्ही नोकरी करत होतो. आम्हाला १३ ते १४ हजार रुपये पगार मिळत होता, असे दुसरा तरूण कौशिक रावल सांगतो. प्रकरणातून मार्ग निघत नसल्याचे पाहून हे सर्व जण हिरे घिसाई कामगार संघटनेकडे गेले. सर्व कामगारांना कामावर परत बोलावण्यास कंपनी मालकही राजी झाले आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष जयसुख गजेरा म्हणाले. परंतु हिरे उद्योगातील मंदीशी या प्रकरणाची सांगड घातली जात आहे. हिरे कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...