सुरत- सुरतमध्ये राहणाऱ्या कौशल बानू खेर (२४) या विवाहितेनेे संस्कृत भाषेत एमएमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. वेदांत फिलॉसॉफी आणि भागवत पुराण या विषयांत ही सुवर्णपदके प्राप्त केली. त्याचबरोबर वीर नर्मदा विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांतून ८४ टक्के गुण मिळवून ती सर्वप्रथम स्थानावर आली .
लग्न झालेले असल्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु तिने हिंमत सोडली नाही. वालिता तालुक्यातील महिला कला महाविद्यालयात पदवी प्राप्त केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याची तिची इच्छा नव्हती. तिला संस्कृत विषयाची आवड होती. रामायण आणि महाभारतातून संस्कृतमध्ये एमए करण्याची प्रेरणा मिळाली, असे कौशल बानूने सांगितले.
कौशल बानूच्या शब्दांत तिची यशकथा : मी एमएचे शिक्षण घेत असताना माझे लग्न झाले. पहिल्या सत्रात मी गर्भवती होते. त्यानंतर मुलाचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर माझे शिक्षण थांबण्याची शक्यता होती. परंतु माझे आईवडील आणि पतीने मला खूप पाठबळ दिले. जसजशी परीक्षा जवळ येत गेली, माझ्या अभ्यासाची वेळ वाढत होती. मी झोपेची वेळ कमी केली. खूप कठोर परिश्रम घेऊन मी सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.
पहाटे तीन वाजता झोपेतून उठून मी अभ्यासाला बसत होते. लाइट लागल्याने मुलगा उठू नये, त्याची झोपमोड होऊ नये यासाठी परीक्षेच्या काळात माझ्या वडिलांकडे त्यास पाठवून दिले.
१६ तास अभ्यास
संस्कृतमध्ये आधीपासूनच आवड होती. शेवटच्या महिन्यात मी १६ तास अभ्यास करत होते. यामुळेच मला दोन सुवर्णपदके मिळाली.