आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेलवर गुजरातमध्ये देशद्रोहाचा दुसरा गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - हार्दिक पटेलवर सुरतमध्ये दाखल राष्ट्रद्रोहाच्या खटल्यात सरकार उच्च न्यायालयात समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. याव्यतिरिक्त त्यांच्याविरुद्ध मंगळवारी अहमदाबाद पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा आणखी एक खटला दाखल केला. अहमदाबाद पोलिसांनी हार्दिकशिवाय पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या अन्य संयोजकांनाही देशद्रोहाच्या प्रकरणात आरोपी केले आहे. हार्दिकवर गुजरातमध्ये देशद्रोहाचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

त्याआधी अहमदाबाद पोलिसांनी गुजरात उच्च न्यायालयाबाहेर दिनेश पटेल व चिराग पटेल यांना अटक केली. दोघे हार्दिकचे सहकारी आहेत आणि हॅबियस कॉर्पस प्रकरणाच्या सुनावणीसाठी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सरदार पटेल सेवा ग्रुपचे (एसपीजी) लालजी पटेल यांनाही ताब्यात घेतले आहे. लालजी पाटीदार आंदोलनात सक्रिय आहेत. गुन्हे शाखेच्या के. एन. पटेल यांनी २५ ऑगस्ट रोजी पाटीदार समाजाच्या महाक्रांती सभा आणि रात्री उशिराच्या हिंसाचारप्रकरणी हार्दिक व अन्य व्यक्तींविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. उच्च न्यायालयात हॅबियस कॉर्पस आणि हार्दिकचे वडील भरतभाई पटेल यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

देशद्रोहाप्रकरणी उच्च न्यायालयात प्रश्न :
हार्दिकविरुद्ध देशद्रोहाच्या प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत विचारले की, पोलिसांशी संबंधित मत व्यक्त करणे आयपीसीचे कलम १२४(अ) अंतर्गत देशद्रोह आहे? न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या पीठाने गुजरात सरकारला म्हटले की, हार्दिकविरुद्ध लावलेल्या देशद्रोहाच्या कलमाचे स्पष्टीकरण द्या. या प्रश्नांवर सरकार संभ्रमावस्थेत दिसले. उत्तर देण्यासाठी अवधी मागितला. शुक्रवारपर्यंत ही मुदत देण्यात आली. पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी आहे.