आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेशला अखेर तीस वर्षांनंतर मिळाला न्याय, राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा- गुजरातमधील बडोदा येथे राहणाऱ्या महेश चौहान यांना तीस वर्षांनंतर का होईना अखेर न्याय मिळाला आहे. हे प्रकरणही तेवढेच संवेदशनशील आहे. शहरात अचानक दंगल भडकली आणि पोलिसांच्या गोळीबारात एक गोळी महेश यांच्या पायात घुसली. पाय निकामी झाला.

याची नुकसान भरपाई मागण्यासाठी महेशनी कितीतरी वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवले. मात्र त्याच्या पदरी कायम निराशाच पडत होती. अखेर गुजरात हायकोर्टाने त्याला गेल्या बुधवारी न्याय दिला. राज्य सरकारला फटकारून न्यायालयाने त्याला ६ टक्के वार्षिक व्याजदराने १.७० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, असा आदेश दिला.

हे प्रकरण जून १९८५ मधील आहे. महेश आपल्या चुलत बहिणीला सोडण्यासाठी जुन्या बडोदा शहरात गेले होते. अचानक दोन गट परस्परांशी भिडले. यादरम्यान पोलिसही दाखल झाले आणि गोळीबार सुरू झाला. एक गोळी त्यांच्या पायात घुसली. शेवटी उपचारांदरम्यान त्यांचा पायच कापावा लागला. कित्येक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर २०१४ मध्ये स्थानिक न्यायालयाने महेशना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. सरकारने या आदेशला हायकोर्टात आव्हान दिले. मात्र, न्यायमूर्तींनी सरकारला नोटीस जारी करण्याऐवजी थेट नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

त्यांना माहीतही नव्हते...
तीस वर्षे उलटून गेल्यानंतर या गोळीबाराबद्दल आणि पाय निकामी झाल्यानंतर सरकारकडून काही नुकसान भरपाई मिळेल, ही आशा खरे तर संपलीच होती. अशात त्यांचे या सुनावणीकडेही लक्ष राहिले नव्हते. त्यामुळे बुधवारी गुजरात हायकोर्टाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले असल्याचे महेशना माहीतही नव्हते. "दिव्य भास्कर'च्या प्रतिनिधीने त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली तेव्हा महेशसह त्यांच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले, आता इतक्या वर्षांनंतर न्याय मिळेल याची आशाच राहिली नव्हती. पूर्वी नोकरीत रजा टाकून कोर्टात जात होतो. आता अॅड. मयांक देसाईच काम पहात होते. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांचीही भेट झालेली नाही.

हायकोर्ट म्हणाले...
न्यायालयाला आता काहीही ऐकण्याची इच्छा नाही. दोन न्यायालयांनी नुकसानभरपाई द्यावी म्हणून आदेश दिले आहेत. आता राज्य सरकारने १.७० लाख रुपये ६ टक्के वार्षिक व्याजदराने (अंदाजे १० लाख रुपये) महेशला द्यावेत.

अॅल्युमिनियमचा पाय
पायाला गोळी लागला तेव्हा महेश अवघा १७ वर्षांचा होता. जखम इतकी खोल होती की गुडघ्यापर्यंत पाय कापावा लागला. नंतर अॅल्युमिनियमचा कृत्रिम पाय लावून तो जगत आहे. हा पाय महेशला दर पाच वर्षांनंतर बदलावा लागतो हे विशेष.