भावनगर- गुजरातमधील भावनगर येथे विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) एका मुस्लिम व्यापार्यावर दबावतंत्राचा वापर करत त्याला
आपला बंगला विकण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. या व्यापार्याने गेल्या वर्षीच हा बंगला खरेदी केला होता. परंतु, विहिंप आणि आरएसएसने भावनगरात 'राम दरबार' भरवून एक वर्षाच्या आतच मुस्लिम व्यापारीला आपला बंगला विक्री करावा लागला.
मिळालेली माहिती अशी की, स्क्रॅप डीलर अली असगर जावेरी यांनी भावनगरमध्ये हिंदू बहुल भागात 10 जानेवारी, 2014 ला बंगला खरेदी केला होता. जावेरी यांनी बंगला खरेदी केल्यानंतर आजुबाजुला राहाणार्या हिंदु लोकांनी विरोध दर्शवला होता. विहिंपचे नेते प्रवीण तोगडीया यांनी आधीच तेथील लोकांना अपील केले होती की, कोणत्याही परिस्थिती या भागात मुस्लिम व्यक्तीला घर मिळता कामा नये. वर्षभर प्रचंड विरोध सहन केल्यानंतर अखेर अली असगर जावेरी यांनी 30 डिसेंबर, 2014 ला आपला बंगला रियल एस्टेट कंपनी भूमती एसोसिएट्सला विकला.
विशेष म्हणजे भूमती एसोसिएट्सला विकला तेव्हा आरएसएस आणि विहिंपच्या सदस्यांनी मध्यस्थी केली होती. भूमती एसोसिएट्स या कंपनीत तीन जैन लोकांची भागिदारी आहे.
जावेरी यांनी 49 लाख रुपयांत हा बंगला हॉटेल व्यावसायिक किशोर सिन्हा गोहली यांच्याकडून खरेदी केला होता. जावेरी यांनी बंगला खरीदी केल्यानंतर दोन महिन्यांतच याभागातील हिंदु लोकांना विरोध दर्शवला होता. हिंदु लोकांनी मुस्लिम परिवाराचे राहाणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता.
दरम्यान, विहिंप नेते प्रवीण तोगडीया यांनी हिंदु बहुल भागात बंगला खरेदी केलेल्या जावेरींच्या विरोधात आंदोलन छेडले होते. एवढेच नव्हे तर तोगडीयांनी जावेरींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी तोगडीयांविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
जावेरी यांची बंगला विकण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना याच भागात राहायचे होते. बंगला न विकता तो आपण हिंदु व्यक्तीला भाड्याने देईल, असा पर्याय जावेरी यांनी दिला होता. परंतु आरएसएसने त्याला विरोध दर्शवला होता. नंतर जावेरी यांनी आपला बंगला सिनेमाच्या शूटिंगसाठी एका कंपनीला देण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, विहिंप आणि आरएसएसने त्यालाही विरोध दर्शवला. अखेर जावेरी यांनी बंगला विकला.
150 बंगल्यात फक्त चार मुस्लिम कुटुंबे
मेघानी सर्कल हा भाग हिंदु बहुल आहे. या भागात जवळपास 150 बंगले आहेत. यापैकी फक्त चार बंगले मुस्लिम कुटुंबीयांचे आहेत. चारपैकी दोन कुटुंबे 2002 मधील दंगलीनंतर शिशो विहार येथे राहायला गेले आहे.
'राम दरबार', भजनसंध्याचे आयोजन करुन विरोध
मुस्लिम कुटुंबाला विरोध करण्यासाठी मेघानी सर्कल भागात हिंदू लोकांनी राम दरबार भरवायचे. विशेष म्हणजे जावेरी यांच्या बंगल्या शेजारी दररोज सायंकाळी हनुमान चालीसा पठण आणि भजनसंध्या कार्यक्रम होत असे. राम दरबारात 19 एप्रिल, 2014 रोजी प्रवीण तोगडीयांचे भाषण झाले. जावेरी यांनी आपला बंगला 48 तासांत खाली करत नसेल तर, भावदेवडी स्ट्रीटवरील त्याच्या कार्यालयावर हल्ला करा, असे तोगडियांनी हिंदू लोकांना चिथावणी दिली होती.