अहमदाबाद - दक्षिण गुजरातमध्ये विश्व हिंदु परिषदेने 200 हून अधिक आदिवासी ख्रिश्चनांचे धर्मांतर करून त्यांना हिंदु बनवले आहे.
व्हीएचपीच्या वतीने शनिवारी दुपारी वलसाड जिल्ह्याच्या काप्रदा तालुक्यातील अरनई गावात या 'घर वापसी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हीएचपी आणि इतर काही धार्मिक संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत सहा गावांतील आदिवासी स्नान केल्यानंतर हवनमध्ये सहभागी झाले. त्यानंतर धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर 'गंगाजल' टाकले आणि त्यांचे शुद्धीकरण केले.
धार्मिक विधी करणा-या प्रफुल्ल शुक्ला यांनी हे या लोकांचे घरी परतणे असल्याचे सांगितले. शुक्ला म्हणाले, हिंदुस्तान हिंदुंचा देश आहे आणि हिंदुंचाच राहील. ज्यांचे धर्मांतर करण्यात आले त्या सर्वांनी काही दिवसांपूर्वीच धर्मांतर केले होते. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांचा फक्त हिंदु धर्मात औपचारिक प्रवेश झाला.
कोणतीही बळजबरी नाही
ख्रिश्चन धर्मातून हिंदु बनलेल्या रंकाबेन सोमाभाई कादत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला हिंदु धर्मात परतण्याची इच्छा होती. माझा भाऊ आजारी पडला होता पण नंतर तो फादरच्या उपचाराने बरा झाला. त्यानंतर तो ख्रिश्चन बनला. त्यानंतर मीही ख्रिश्चन बनलो. माझा भाऊ आणि त्याची मुले आजही ख्रिश्चन धर्मात आहेत. पण मी पुन्हा हिंदु बनण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी माझ्यावर कोणीही बळजबरी केली नाही.
धर्मांतर म्हणण्यास विहिंपचा विरोध
गुजरातचे विहिंप प्रमुख कौशिक मेहता म्हणाले की, ही धर्मांतरणाची घटना नाही. तर ही घरी परतण्याची एक प्रक्रिया आहे. कोणत्याही आमिषाशिवाय लोक ती स्वीकारत आहेत. जे लोक भीती आणि इतर कारणांमुळे दुस-या धर्मात गेले होते, ते परतत आहेत.