आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bagdri Jabalpur Water Fall Incident 12 People Were Swept Away

PHOTOS: एका पाठोपाठ एक संपूर्ण कुटूंब वाहून गेले धबधब्यात, 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/दमोह- मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एक हॉटेल व्यावसायिक कुटूंब बगदरी धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेसावधपणाने तीन चिमुरडे, पाच महिलांसह 11 जणांचा बळी गेला आहे. 300 फूट खोल धबधब्यात छिन्नविछिन्न झालेले 11 मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर येथील मलिक हॉटेलचे संचालक मलिक अंसारी हे रमजान ईदनंतर कुटूंबीयांसोबत दमोह जिल्ह्यातील बगदरी धबधब्याच्या परिसरात पर्यटनासाठी गेले होते. सोमवारी दुपारी 12 वाजता अंसारी कुटुंबातील आणि त्यांच्या सासूरवाडीतील असे सगळे 22 सदस्य दगदरी धबधब्यावर पोहोचले. तेव्हा धबधब्यात पाणी कमी होते. पाणी वाढण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. सर्व जण धबधबा ओलांडून जंगलात फिरण्‍यासाठी गेले होते.
मात्र, दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला. यावेळी राजदा (18), मुमताज (40), जैद उर्फ राजा (16), जोया (2), महरूम (35), मलिक (40), उसरा अफजल (15), अजरा (दीड वर्ष), खैनीदा (30), उवेस (5), शबाना अंसारी (20) आणि साहिस्ता परवीन (30) धबधब्याकडे पळाले. सुरक्षित जागा शोधू लागले. सगळ्यांनी एकमेकांचा हात घट्ट पकडून धबधबा ओलांडत असतानाच अचानक पाणी वाढले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, एका पाठोपाठ एक असे सगळे वाहून गेले. सबीना या धबधब्याच्या पलिकडेच थांबून हताश डोळ्यांनी सगळ्यांचा मृत्यू पाहात होत्या. त्या जीवाच्या आकांताने आक्रोश करत होत्या. परंतु पाऊस प्रचंड होता. यामुळे त्यांच्या मदतीसाठी कोणीही येऊ शकले नाही.

या घटनेची माहिती जबलपूर प्रशासनाला कळवण्यात आली. त्यांनी तातडीने दमोहचे जिल्हाधिकारी आणि एसपीची मदत मागितली. दोन्ही जिल्ह्याचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्य सुरु करण्यात आले. परंतु, त्याला खूप उशीर झाला होता. आठ जणांचे मृतदेह 300 फूट खोल धबधब्याच्या पायथ्याला छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.
मलिक अंसारी यांच्या कुटूंबासोबत सासुरवाडीचेही काही सदस्य असे एकूण 22 जण दगदरी धबधबा परिसरात पिकनिकसाठी आले होते. त्यापैकी 11 जण धबधब्यात वाहून गेले आहेत. नेमकी घटना कशी घडली, हे सांगण्यासाठीही कोणी नसल्याने बचाव पथकाला अनेक अडचणी येत आहे.

जेनरेटर आणि सर्च लाइट्‍सच्या मदतीने शोधमोहीम...
सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आठ जणांचे मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले. मात्र, त्यानंतर अंधार पडल्याने मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. त्यानंतर प्रशासनाने जेनरेटरची व्यवस्था केल्याने सर्च लाइट्‍सच्या मदतीने रात्री उशीरापर्यंत तिन्ही बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु होता. अखेर आज सकाळी तिघांचे मृतदेह आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच जबलपूरचे आयुक्त दीपक खांडेकर, आयजी उपेंद्र जैन, जिल्हाधिकारी विवेक पोरवाल, एसपी हरिनारायण आर्य तसेच दमोहचे जिल्हाधिकारी स्वतंत्र कुमार सिंह आणि एसपी सिद्धार्थ बहुगुणा तसेच जबलपूर, पाटण, तेंदूखेड़ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दगदरी धबधबा दमोह-जबलपूर महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात आहे. रविवार तसेच सुटीच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. महाविद्यालयीत तरुण-तरुणी, नवविवाहित जोडपे पिकनिकसाठी येथे येत असतात. पावसाळ्यात दगदरी धबधबा ओसंडून वाहतो. त्यामुळे येथे गर्दी होत असते. मात्र, दगदरी धबधबा क‍िती धोकेदायक आहे, हे यापूर्वी घडलेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. असे असतानादेखील जबलपूर प्रशासनाद्वारा आजपर्यंत येथे कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतलेली दिसत नाही. पर्यटकांसाठी साधा सतर्कतेचा इशारा देणारे फलकही कुठे दिसत नाही.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, या दुर्घटनेची भीषणता दर्शवणारी छायाचित्रे...

(छायाचित्रकार: विवेक बबेले, पाटण, जिल्हा जबलपूर)
(फोटो: 300 फूट उंच धबधब्यावरून पडल्याने छिन्नविछिन्न झालेले मृतदेह)