भोपाळ - तुमचे मोबाइल सिमकार्ड अचानक ब्लॉक झाल्यास त्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नका. फसवेगिरी करून तुमच्या नावावरील सिम बंद केले जाऊ शकते. मध्य प्रदेश पोलिसांनी एका हायटेक टोळीच्या अशाच कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे.
ही डोकेबाज टोळी आधी खोटी तक्रार देऊन नेट बँकिंग वापरणा-या एखाद्या ग्राहकाचे सिमकार्ड ब्लॉक करते. नंतर खोटी कागदपत्रे जमा करून त्याचे डुप्लिकेट सिम मिळवते. अशा पद्धतीने नेट बँकिंगचा पासवर्ड मिळवून ग्राहकाच्या पैशांवर डल्ला मारते.
अशाच एका टोळीने मध्य प्रदेशातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक संजय प्रगट यांचे सिमकार्ड ब्लॉक केले. यानंतर खोटी कागदपत्रे जमा करून नवे सिमही मिळवले. ऑनलाइन बँकिंगमध्ये नोंदणी असलेल्या या सिमचा चार वेळा वापर करून त्यांनी संजय यांच्या खात्यातून 10 लाख 500 रुपयांची रक्कम काढून घेतली. ही रक्कम कानपूर व लखनऊतील आदित्यकुमार अवस्थी व अजय तिवारी यांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आली.
अशी होते फसवेगिरी
०नेट बँकिंगशी जुळलेले मोबाइल नंबर भामट्यांची टोळी आधीच हेरून ठेवते. ०यानंतर आपले सिम वा मोबाइल हरवल्याची खोटी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली जाते. ०त्याच्या पावतीच्या आधारे ही टोळी जुने कार्ड ब्लॉक करून नवे सिमकार्ड मिळवते. ०यानंतर फॉर्गेट पासवर्डच्या बहाण्याने त्या सिमशी जुळलेला नेट बँकिंग पासवर्ड मिळवला जातो. ०पासवर्ड मिळताच ग्राहकाच्या खात्यावर डल्ला मारून त्यातील रक्कम बनावट नावाच्या खात्यावर वळवली जाते.
ही सावधगिरी बाळगा
० अनोळखीपुढे नेट वा मोबाइल बँकिंगचा वापर करू नका. ०पासवर्ड वा जन्मतारखेशी निगडित वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे ति-हाईतास देऊ नका. ०मोबाइलचे सिम अचानक बंद पडल्यास सतर्कता बाळगा. ०शंका वाटल्यास तत्काळ नेट बँकिंगची सुविधा ब्लॉक करा.