आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या अडीच सेकंदांत एटीएममधून १ कोटी ६४ लाख रुपये लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- एकेकाळी पंजाबमध्ये लुधियानामध्ये कुरिअर बॉयची नोकरी करणाऱ्या तीन भामट्या तरुणांनी देशभरात ५०० पेक्षा जास्त बँकांना गंडा घातला आहे. अवघ्या अडीच सेकंदांत बँकांच्या एटीएममधून १ कोटी ६४ लाख रुपये काढून त्यांनी हा उद्योग केला आहे. दोघांपैकी एक तरुण एटीएममध्ये कार्ड स्वाइप करून रक्कम काढत असे, तर दुसरा एटीएमचा वीजपुरवठा खंडित करत असे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बँकांच्या एटीएममध्ये ट्रँझॅक्शन कोड जनरेट होण्यासाठी अडीच सेकंद लागतात. आरोपी याच अवधीचा फायदा घेऊन ही फसवणूक करत असत. आरोपी परविंदर व नरेंद्रजित सिंह यांना या प्रकरणात भोपाळ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा मुख्य आरोपी फरार आहे. भोपाळमधील पीरगेट भागातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम या टोळीने लुटले.
सुरक्षा गार्ड पुष्पेंद्र यादवने कोतवाली पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. पुष्पेंद्रने सांगितले की, दोन तरुण एटीएममध्ये आले. त्यांनी पुष्पेंद्रला एटीएमच्या बँक रूममध्ये बंद केले. तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्क्रीनदेखील लावलेली होती. या स्क्रीनमध्ये त्याने पाहिले की, दोन आरोपींपैकी एकाने एटीएममधून रक्कम काढली व दुसऱ्याने इशारा मिळताच एटीएमचा वीजपुरवठा खंडित केला. पुष्पेंद्रने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात विविध ठिकाणी छापे मारून दोघांना अटक केली आहे.
१७ बँकांची फसवणूक
तिन्ही आरोपी केवळ १२ वी पास आहेत. दोन वर्षांपूर्वी आरोपींनी अशाच प्रकारे एटीएममधून पैसे काढले. पैसे काढताना ते जाणीवपूर्वक दुसऱ्या एटीएम कार्डचा वापर करत असत. जेणेकरून नोंदणी होण्यास जास्त वेळ लागू शकेल. त्यांनी अशाच प्रकारे देशभरात १७ बँकांच्या ५०० एटीएममध्ये फसवणूक केल्याचे आढळून आले. पोलिसांनी या आरोपींकडून दोन डायऱ्या, ६० एटीएम कार्ड, तीन मोबाइल फोन, ४४ हजार रुपये रोख जप्त केले.
बातम्या आणखी आहेत...