भोपाळ - येथे गुरुवारी दहावे विश्व हिंदी संमेलन प्रारंभ झाले. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी मोदी म्हणाले, या डिजिटल युगात इंग्रजी, हिंदी आणि चिनी या तीन भाषांचाच दबदबा राहणार आहे. या दृष्टीने तंत्रज्ञांनी भारतीय भाषांसह हिंदीला आधुनिक तंत्राशी जोडण्याची जबाबदारी स्वीकारावी. यासाठी नवी सॉफ्टवेअर्स व अॅप्स तयार करावीत, असेही ते म्हणाले.
हिंदी भाषेला प्रतिष्ठा देण्याचाच आजवर प्रयत्न केला असल्याचे सांगून जेव्हा भाषा अस्तित्वात असते तेव्हा तिचे महत्त्व कळत नाही, असे मोदी म्हणाले. कालांतराने भाषा लुप्त होते आणि मग संशोधनावर भर दिला जातो. म्हणूनच हा वारसा जपण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंदीचे ज्ञान नसले असते तर...
माझी मातृभाषा गुजराती आहे. हिंदी नाही. मात्र, हिंदीचे ज्ञान मला नसते तर काय झाले असते, असा विचार मी नेहमी करतो. मी लोकांची मने कशी जाणून घेऊ शकलो असतो? ज्या लोकांची, नेत्यांची मातृभाषा हिंदी नव्हती त्यांनीच या देशात हिंदी भाषेचे आंदोलन चालवले असल्याचा उल्लेख करून मोदींनी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काकासाहेब कालेलकर, राजगोपालाचारी यांची उदाहरणे दिली. त्यांची ही दूरदृष्टीच आपल्यासाठी खरी प्रेरणा असल्याचे मोदींनी नमूद केले.