आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायपूर- प्रेमाच्या शस्त्राने नक्षली हिंसाचार नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यामुळेच छत्तीसगडमधील एरिया कमांडरने प्रेमासाठी साथीदारांसोबत बंड करायला मागचापुढचा विचार केला नाही. नक्षली नेत्यांच्या लोकन्यायालयात संबंधित नेत्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
एरिया कमांडरचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. तिच्याशी लग्न करून सुखी संसार थाटण्याचे त्याने स्वप्न पाहिले एवढाच त्याचा गुन्हा होता. वरिष्ठ नेत्यांनी त्याचे काहीएक म्हणणे ऐकून घेतले नाही. अखेर कडवट विचारसरणीवर हळुवार प्रेमभावनेने विजय मिळवला. एरिया कमांडरने प्रेयसीला घेऊन वनातून बाहेर पडणे पसंत केले. दक्षिण बस्तर जिल्हा समितीचा मलांगीर एरिया कमांडर बदेरू पोडियामीची ही कथा. त्याने सध्या नक्षल्यांसोबतचे संबंध तोडले आहेत. बिजापूर येथील गंगालूर तालुक्यातील पुस्नार गावातील 30 वर्षांचा बदेरू 13 वर्षांपासून सरकारशी लढा देत आहे. पोलिस आणि सीआरपीएफविरुद्ध त्याने अनेक मोहिमांत भाग घेतला आहे. त्याच्या कामाची पोच म्हणून नक्षल्यांनी त्याला किरंदुलच्या पर्वत क्षेत्रात मलांगीर एरिया कमिटीचा कमांडर बनवले.
याच गावातील सुक्खी या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघे पोलिस आणि नक्षल्यांना सुगावा न लागता भेटत राहिले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुक्खीने मात्र त्यासाठी नक्षली कारवाया सोडण्याची अट घातली. बदेरूने त्यास संमती दिली व आपल्या वरिष्ठांना तसे कळवले. बस्तरमधील नक्षली नेत्यांना मात्र प्रेमात विरघळलेला कमांडर पाहून आश्चर्य वाटले आणि संतापही आला. बदेरूला माओवादी विचारसरणीची आठवण करून देत त्याचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न झाला. त्यासाठी त्याचा छळही करण्यात आला. मात्र, प्रेयसी आणि तिच्या प्रेमासाठी त्याने नक्षली हिंसाचाराला तिलांजली देणे पसंत केले.
बदेरू मोस्ट वाँटेड कमांडर- बदेरू 17 व्या वर्षाआधी संघमचा व त्यानंतर दलमचा सदस्य झाला. कठोर प्रशिक्षण आणि माओवादाच्या शिकवणीमुळे तो नक्षली कारवायांसाठी तयार झाला. नक्षली नेत्यांचा विश्वास संपादन करून दलम समितीचा तो मुख्य सदस्य झाला. त्याच्या अखत्यारीत 100 हून जास्त दलम सदस्य आणि 400 हून अधिक संघम सदस्य होते. तो मोस्ट वाँटेड कमांडर आहे, अशी माहिती दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक नरेंद्र खरे यांनी दिली. त्याच्या नेतृत्वाखाली मार्च 2010 मध्ये किरंदुल माइन्समध्ये सीआरपीएफ छावणीवर हल्ला करण्यात आला. यात सात जवान शहीद झाले होते. बचेलीमध्ये गाडी उडवण्यात आली होती, त्यात दोघे जवान शहीद झाले होते. जगदलपूरमध्ये एस्सार कंपनीच्या 30 गाड्यांना आग लावण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी किरंदुलमध्ये सीआरपीएफवर हल्ला करण्यात आला. त्यात दोन जवान शहीद झाले होते. 2012 मध्ये सीआरपीएफच्या छावणीवर हल्ला करण्यात आला. त्यात दोन जवान शहीद झाले.
कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी- सुक्खीचे कुटुंबीय तिच्या लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. यासाठी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये एक बैठक झाली आहे. आदिवासींच्या परंपरेनुसार तरुणाने एखाद्या तरुणीला पळून नेले असेल तर मुलीच्या कुटुंबीयाला भेटवस्तू द्यावी लागते. यानंतर पंचायत लग्नाचा निर्णय घेते.
नक्षली बनवल्यानंतर छळ - नक्षल्यांचे वरिष्ठ नेते आंध्र प्रदेशातील आहेत. छत्तीसगडमधील आदिवासींना पहिल्यांदा नक्षली केले जाते व त्यानंतर त्यांचा छळ केला जातो. मानवी हक्कानुसार सर्वांना लग्न करण्याचा हक्क आहे. बदेरू शरण आल्यास पोलिस त्याला मदत करतील. - रामनिवास, पोलिस महासंचालक, छत्तीसगड.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.