आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Hoists National Flag Atop RSS Office In Indore

संघ कार्यालयावर फडकवला तिरंगा, स्वयंसेवकांनी केले काँग्रेसच्या आंदोलकांचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी इंदूरच्या संघ कार्यालयावर जाऊन तिरंगा ध्वज फडकवला. मात्र, संघ कार्यकर्त्यांनी आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करत त्यांच्यासोबत ध्वजाला वंदन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांच्या नेतृत्वात सुमारे ८०० पेक्षा अधिक कार्यकर्ते संघ कार्यालयात पोहोचले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभक्तीच्या नावाखाली फक्त बोलघेवडेपणाच करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. दरम्यान, सुरुवातीला पोलिसांनी काँग्रेसच्या या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, संघ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर यादव यांच्यासह २० नेत्यांना संघ कार्यालयात जाऊ दिले. दुसरीकडे, संघ कार्यकर्त्यांनी आंदोलकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करत त्यांना टिळाही लावला. यादव यांनी संघ कार्यालयावरील भगव्या ध्वजाच्या शेजारी तिरंगा फडकवला. त्या वेळी उपस्थित संघ कार्यकर्त्यांनीही ध्वजाला वंदन करत राष्ट्रगीत गायले. अरुण यादव या वेळी म्हणाले, केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि संघाचे लोक देशभक्तीवरून आपली शिकवण लादण्याचा प्रयत्न करत आहेत. संघ या बाबीवर फक्त भाषणबाजीच करत आहे.

आमच्या आयुष्यात राष्ट्रध्वजाचे स्थान महत्त्वाचे : जैन
संघाकडून विभाग कार्यवाह दिलीप जैन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. हा भावनात्मक विषय असून प्रत्येक राष्ट्रीय उत्सवावेळी संघाकडून आपले कार्यालय, संस्था इत्यादी ठिकाणी तिरंग्याला सलामी दिली जाते. भगव्या ध्वजाचा संघाने सांस्कृतिक प्रतीकाच्या रूपात स्वीकार करत गुरूचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय ध्वज आणि भगव्या ध्वजाचे आमच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असल्याने आम्हाला या मुद्द्यावर वाद करायचे नाहीत, असे जैन म्हणाले.