उज्जैन/बडनगर - मध्य प्रदेशातील बडनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटात 12 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झाला. मृतदेह पूर्णपणे खाक झाल्याने त्यांची ओळख पटवता आलेली नाही. चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. रात्री 11 वाजता मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.
उज्जैनपासून 45 किमी अंतरावरील बडनगर कारखान्यात सायंकाळी चार वाजता पहिला, दहा मिनिटांनंतर आणखी एक स्फोट झाला. त्याने अख्खे शहर हादरून गेले. कारखान्याच्या भिंती कोसळल्या, छप्पर 300 मीटर लांब जाऊन पडले. घटनेदरम्यान कारखान्यात 19 जण काम करत होते. तेथे 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यात 12 महिला, दोन पुरुष व एका 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या कारखान्यात भुईनळे व सुतळी बॉम्ब तयार केले जात असत. संचालक युसूफ हुसेनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांन दीड लाखांची मदत जाहीर केली आहे.