उज्जैन - मध्य प्रदेशातील महिदपूरचे भाजप आमदार बहादूरसिंह चौहान यांनी
आपण पक्षासाठी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याची कबुली दिल्याचा कथित व्हिडिओ सार्वजनिक झाल्याने खळबळ उडाली आहे. आमदार असताना मी कोट्यवधी रुपयांची लाच घेतली. ही लाच आपण स्वत:साठी नव्हे, तर पक्षासाठी स्वीकारल्याचे सांगताना चौहान व्हिडिओत दिसतात.
आमदार चौहान यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले याचा उल्लेख नाही; परंतु शुक्रवारी रात्रीपासून हा व्हिडिओ चर्चेत आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. आमदाराच्या व्हिडिओमुळे पक्षाच्या सर्वच आमदारांवर संशय निर्माण झाला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य प्रतापसिंह गुर यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आमदार चौहान यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही : दिव्य मराठी नेटवर्कने जेव्हा आमदार चौहान यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे प्रकरण आपल्याला माहीत नसल्याचे सांगून बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला.
आम्ही अशा वादाचे टेन्शन घेत नाही, असे ते म्हणाले. पण त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय वाद सुरू झाला आहे.
भाजप अडचणीत, हात झटकण्याचा प्रयत्न
काँग्रेसचे माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांनी कोट्यवधींची लाच स्वीकारल्याची कबुली देणा-या आमदार चौहान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत राज्यपालांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह म्हणाले, आपण व्हिडिओ पाहिलेला नाही. जर तो खरा असेल तर त्यांच्याकडे खुलासा मागवला जाईल.