आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्रजी अग्रवाल यांना अखेरचा निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल पंचतत्त्वात विलीन झाले. गुरुवारी भोपाळच्या भदभदा विश्रामघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेशजींना बुधवारी अहमदाबाद विमानतळावर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांचे ज्येष्ठ पुत्र सुधीर अग्रवाल यांनी मुखाग्नी दिला. निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने त्यांचे चाहते सहभागी झाले होते. 

राजकीय, सामाजिक, व्यापार-उद्योग व मीडिया जगतातील हजारो लोकांनी त्यांना साश्रुनयनांनी निरोप दिला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मंत्री ब्रजमोहन अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. रमेशजींना आदरांजली म्हणून राजधानी भोपाळमध्ये सर्व प्रमुख बाजारपेठा अर्धा दिवस बंद ठेवण्यात आल्या होता. शनिवार, १५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता लाल परेडस्थित मोतीलाल नेहरू स्टेडियमवर उठावना होईल. 

रमेशचंद्रजींना काल (बुधवारी) सकाळी 11 वाजता अहमदाबाद विमानतळावर हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 73 वर्षांचे होते. रमेशजी मंगळवारी भोपाळहून दिल्लीला गेले होते. बुधवारी सकाळच्या विमानाने ते 11 वाजता अहमदाबादला पोहोचले होते. विमानातून उतरताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह राजकीय  व उद्योग जगतातील मान्यवरांनी त्यांंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादेत त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. 

रमेशजींचा जन्म 30 नोव्हेंबर 1944  रोजी उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये झाला होता. झाशीतच त्यांनी  उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. तेथे त्यांचे वडील सेठ श्री द्वारकाप्रसाद अग्रवालजी यांचा पुस्तकांचा व्यवसाय होता. 1956 मध्ये रमेशजी वडिलांसोबत भोपाळला आले.

त्यांनी भोपाळ विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली. पत्रकारितेत त्यांना राजीव गांधी जीवन गौरव पुरस्काराने गौरवले होते. 2003, 2006 व 2007 मध्ये इंडिया टुडेने त्यांना देशातील प्रभावशाली 50 व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केले होते.  त्यांना 2012 मध्ये फोर्ब्जने देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 95 वे स्थान दिले होते.त्यांच्या नेतृत्वात समूहाने हिंदीत दैनिक भास्कर, गुजरातीत दिव्य भास्कर, इंग्रजीत डीएनए व डीबी पोस्ट, मराठीत दिव्य मराठी या वर्तमानपत्रांसह रेडिओ चॅनल माय एफएम व डीबी डिजिटलला मीडियात अग्रणी बनवले. त्यांना सुधीर अग्रवाल, गिरीश अग्रवाल, पवन अग्रवाल ही मुले व भावना अग्रवाल ही मुलगी आहे.

आपण ज्या व्यवसायात आहोत तो लष्करासारखा, खरा सैनिक न लढता शस्त्रे टाकत नाही...
1984 मध्ये भोपाळ वायुगळती दुर्घटनेच्या वेळी या आपत्तीच्या छायाचित्रांसह प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारे दैनिक भास्कर एकमेव वृत्तपत्र होते. विशेष म्हणजे वायुगळतीचा ज्या भागात अधिक प्रभाव होता तेथेच दैनिक भास्करचे कार्यालय होते. वायुगळतीनंतर काही तासांतच रमेशजींनी काही धाडसी साथीदारांना एकत्र बोलावले. या बैठकीत त्यांनी सांगितले होते की - ‘मृत्यू कुणालाच चुकला नाही, तो भेदभाव करत नाही. आपण ज्या व्यवसायात आहोत तो लष्करासारखाच आहे. खरा सैनिक लढल्याविना कधीच शस्त्रे टाकत नाही.’

59 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या भास्करला जगात सर्वाधिक खपाचे चौथे वृत्तपत्र हा सन्मान मिळवून दिला.
1958 मध्ये भोपाळमधून दैनिक भास्कर वृत्तपत्र सुरू झाले. यानंतर 1983 मध्ये इंदूर आवृत्तीचा पाया घातला. 1996 मध्ये दैनिक भास्करने प्रथमच मध्य प्रदेशबाहेर पाऊल ठेवले आणि राजस्थानात दाखल झाला. रमेशजींची दुरदृष्टी आणि लक्ष्य स्पष्ट होते. म्हणूनच आज भास्कर 14 राज्यांत 62 आवृत्त्यांसह देशातील अव्वल वृत्तपत्र आहेच, शिवाय जगातील सर्वाधिक खपाचे चौथ्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
- माध्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल रमेशजी कायम स्मरणात राहतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- माध्यमांतील आधुनिकीकरणाबद्दल रमेशजी स्मरणात राहतील. माध्यमच नव्हे, सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. - सुमित्रा महाजन, सभापती, लोकसभा
- माध्यम व सामाजिक सेवेत रमेशजींचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणे कठीण अाहे. - सोनिया गांधी, अध्यक्षा, काँग्रेस
- संवेदनशील व्यक्ती व निर्णयक्षमतेबद्दल रमेशजी कायम स्मरणात राहतील. मध्य प्रदेशने एक अनमोल रत्न गमावले. - शिवराजसिंह चाैहान, मुख्यमंत्री, मप्र
- ईश्वराचा निर्णय स्वीकारावाच लागतो. अशातच चैत्र नवरात्रात त्यांनी पूर्ण रामकथा ऐकली होती. अत्यंत प्रसन्नचित्ताने त्यांनी कथेची पूर्णाहुती दिली आणि आपले जीवन रामायणास अर्पण केले. त्यांच्या स्मृतींना माझा प्रणाम आणि श्रद्धांजली...  -मोरारी बापू
 
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक..
- रमेशजींच्या निधनाचे वृत्त कळताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. श्रद्धांजली अर्पण केली. 
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, भास्कर समुहाचे चेअरमन श्री रमेश अग्रवाल यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. संवेदनशील आणि तत्काळ निर्णय घेणारे म्हणून ते स्मरणात राहतील. श्री. रमेश अग्रवाल यांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी अशी प्रार्थना मी करतो. श्री रमेश अग्रवालजींचे कुटुंबीय आणि भास्कर समुहाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मध्य प्रदेशने खरंच आज एक अनमोल रत्न गमावला आहे.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. अग्रवाल यांनी केवळ वृत्तपत्राच्या माध्यमातूनच नव्हे तर एफएम रेडिओ आणि डिजिटल माध्यमांद्वारेही समुहाचा विस्तार केला असे फडणवीस म्हणाले.
- महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रमेशचंद्र अग्रवाल यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्रातील एक पर्व संपले असे म्हटले आहे.
- महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दुःख व्यक्त केले. अग्रवाल यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे ते म्हणाले.
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला. रमेश अग्रवालजी यांच्या दुर्दैवी आणि आकस्मिक निधनाने धक्का बसला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे प्रभूंनी ट्वीटमध्ये पोस्ट केले. 
- भाजपाध्यक्ष अमित शहांनीदेखिल ट्विट केले. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे जाणे पत्रकारिता आणि भारतीय माध्यमांसाठी मोठी हानी आहे, अशी पोस्ट त्यांनी केली.
- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, झारखंडचे सीएम रघुवर दास, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि सिनियर जर्नालिस्ट तसेच इंडिया टिव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनीही रमेशजींच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. 
- कांग्रेसचे सरचिटणीस आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही दुःख व्यक्त केले. रमेशजी हे माध्यम जगताचे नेते आणि संवेदनशील समाजसेवक होते. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे ते म्हणाले.

संत भय्यूजी महाराज म्हणाले, पत्रकारितेची मोठी हानी
- संत श्री भय्यूजी महाराज म्हणाले, दैनिक भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या निधनाबाबत समजल्याने धक्का बसला. त्यांचे जाणे हिंदी पत्रकारितेसाठी मोठी हानी आहे. रमेशचंद्र अग्रवाल यांनी दैनिक भास्करला देशातील आघाडीचे हिंदी वृत्तपत्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांना माझी श्रद्धांजली. 
- काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, भास्कर समुहाने माध्यमांमध्ये अनेक नवे किर्तीमान स्थापन केले आहेत. त्यामुळेच आज जागितक माध्यम जगतात भास्कर समुह आणि रमेशचंद्र अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे. माध्यमांबरोबरच समाजसेवा आणि धार्मिक क्षेत्रातील कामांसाठीही रमेशजी कायम स्मरणात राहतील. 
- लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले, रमेशजी खूपच प्रेरणादायी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कुटुंबाला आमच्या संवेदना.
देशातील 50 शक्तीशाली व्यक्तींमध्ये समावेश
- रमेशचंद्र अग्रवाल यांनी भोपाळ विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी पूर्ण केली होती. पत्रकारितेत त्यांना राजीव गांधी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 
- 2003, 2006 आणि 2007 मध्ये इंडिया टुडेने त्यांचा समावेश भारतातील 50 सर्वात शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत केला होता. 

1958 पासून केली होती सुरुवात
-३० नोव्हेंबर 1944 रोजी उत्तर प्रदेशातील झाशी या शहरात त्यांचा जन्म झाला. 1956 मध्ये वडील सेठ श्री द्वारकाप्रसाद अग्रवाल यांच्यासोबत ते भोपाळला आले.
- रमेश अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच भास्कर समुहाने यशाचे शिखर गाठले. त्यांनी 1958 मध्ये मध्य प्रदेशात दैनिक भास्करचा पाया ठेवला. 1983 मध्ये इंदूर आवृत्ती सुरू केली. 1996 मध्ये भास्करने पहिल्यांदा मध्य प्रदेशच्या बाहेर पाऊल ठेवले आणि राजस्थानमध्ये प्रवेश केला.
- आज देशातील 14 राज्यांत या वृत्तपत्राच्या 62 आवृत्ती आहेत. 
- रमेशजी यांच्या नेतृत्त्वातच समुहाने हिंदी वृत्तपत्र दैनिक भास्कर, गुजराती वृत्तपत्र दिव्य भास्कर, इंग्रजी वृत्तपत्र डीएनए, मराठी वृत्तपत्र दिव्य मराठी, रेडिओ चॅनल माय एफएम आणि डीबी डिजिटलला मीडिया जगतात अव्वल स्थानी पोहोचवले.

भोपाळ कर्मभूमी, ग्वाल्हेरमध्ये रमायचे मन
- ग्वाल्हेरमध्ये रमेशचंद्र अग्रवाल यांच्याबरोबर सावलीप्रमाणे राहणारे सत्य कुमार मिश्रा सांगतात, रमेशजींनी ग्वाल्हेरच्याच व्हिक्टोरिया कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते एमएलबी कॉलेज म्हणून ओळखले जाते. ग्वाल्हेरशी रमेशजींचे जवळचे नाते होते. भोपाळ जरी त्यांची कर्मभूमी असली तरी, त्यांचे मन रमायचे ते ग्वाल्हेरमध्येच. देशात अग्रवाल परिचय सम्मेलनाची सुरुवात रमेशजींनी ग्वाल्हेरमधून केली. ग्वाल्हेर मेला प्राधिकरणाचे ते चेअरमनही होते. अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न होते. ग्वाल्हेरच्या छत्री मंडी रामलिला समितीशी ते कायम संलग्न होते. धार्मिक कार्यक्रमांत कायम त्यांचे योगदान असायचे.

- ते सांगतात, रमेशजींना डायबिटीज होते, तरीही बहादुराचे लाडू आणि एसएस कचोरी वाल्याची कचोरी त्यांना खूप आवडायची. ग्वाल्हेरला आल्यानंतर ते नक्की खायचे. शहरातील अनेक लोक जे वृत्तपत्राच्या कार्यालयात यायचे, त्यांना रमेशचंद्र अग्रवाल वैयक्तीकरित्या भेटायचे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील मान्यवरांकडून अादरांजली अर्पण...
संवेदनशील, दूरदृष्टीचा माध्यमकर्मी गमावला...
दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन, ज्येष्ठ उद्योगपती रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनाने देशाच्या माध्यम क्षेत्राला नवा आयाम देणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.  राज्य आणि भाषेच्या मर्यादा ओलांडून दैनिक भास्कर समूहाचा देशभरात विस्तार करण्यामागे अग्रवाल यांचे असामान्य कर्तृत्व होते. भास्कर समूह बहुभाषिक मुद्रित माध्यमात रूपांतरित करतानाच त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतही त्याचा विस्तार केला. विविध प्रांतांतील आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्यात या समूहाला आलेल्या यशामागे अग्रवाल यांची दूरदृष्टी होती. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील माध्यमकर्मी आपण गमावला आहे, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.   

समर्पित कार्यासाठी कायम स्मरणात
दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनामुळे माध्यम क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अापल्या शाेकसंदेशात म्हटले अाहे. अग्रवाल यांना माध्यम क्षेत्राची विलक्षण जाण होती. माध्यमांमध्ये जगभरात घडणाऱ्या बदलांचा ते चालता-बोलता ‘विकिपीडिया’ होते.  त्यांनी केवळ भास्कर समूहाला नव्हे तर हिंदी पत्रकारितेला नवी उंची प्राप्त करून दिली. हिंदीपाठोपाठ त्यांनी मराठी, गुजराती व इंग्रजी भाषेतही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. तब्बल चार दशके माध्यम क्षेत्र गाजविणारे अग्रवाल यांना त्यांच्या समर्पित कार्यासाठी कायम स्मरणात ठेवले जाईल, असे सांगून विखेंनी श्रद्धांजली अर्पण केली.

माध्यम क्षेत्रातील एक पर्व संपले
दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनाने माध्यम क्षेत्रातील एक पर्व संपले, अशा भावना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. अग्रवाल यांनी शून्यातून भास्कर समूहाची स्थापना करून नावारूपाला आणले. हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषांतील वृत्तपत्रांसोबतच रेडिओ चॅनल आणि डिजिटल मीडियात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. केवळ भास्कर समूहच नाही तर  संपूर्ण माध्यम क्षेत्रासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने माध्यम क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत चव्हाण यांनी अादरांजली वाहिली.

रमेशचंद्र अग्रवाल यांनी पत्रकारितेची मोठी सेवा केली
‘रमेशचंद्र अग्रवाल यांनी वृत्तपत्रच नव्हे तर उद्योगातही मोठे यश मिळवले होते. मध्य प्रदेश काँग्रेसचा मी प्रभारी होतो, तेव्हा त्यांच्याशी माझा खूप संपर्क अाला. मी जेव्हा जेव्हा तिथे जात असे तेव्हा तेव्हा मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाशी माझा संपर्क अाला. रमेशचंद्रजी हे कौटुृंबिक संंबंध ठेवणारे एक मोठे उद्योजक, पण त्यांनी ‘भास्कर समूहा’च्या माध्यमातून पत्रकारितेची खूप मोठी सेवा केली अाहे. हिंदीसह गुजराती, मराठी अशा भाषांतही त्यांनी वर्तमानपत्र काढून त्या त्या राज्यातील पत्रकारितेला न्याय दिला. माध्यमात भास्कर समूहाचे मोठे नाव अाहे, ते रमेशचंद्र अग्रवाल यांनी केलेल्या कामामुळेच. त्यांच्या संस्कारांमुळेच त्यांची मुलेही कर्तृत्ववान निघाली. भास्करच्या गुजरात, महाराष्ट्र, बिहारमधील अनेक अावृत्त्यांच्या उद‌्घाटनाला मी उपस्थित राहिलो अाहे. सोलापूरची अावृत्ती काढायची हे तर त्यांनी मला खूप अगोदर सांगितले होते. काही वर्षांत त्यांनी ती अावृत्ती सुरूही केली. उद्योग, पत्रकारिता क्षेत्रातील एक चांगला मित्र अाज गमावला अाहे,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.
 
योगदान सदैव आठवणीत राहील 
 रमेशचंद्र अग्रवाल यांना प्रसिद्धी माध्यमांच्या व्यवसायाची विशेष जाण होती. बदलत्या काळात अनेक धाडसी पावले टाकून त्यांनी भास्कर समुहाचा विस्तार केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हिंदी – गुजराती भाषांतील वृत्तपत्रांना व्यावसायिक यशाचा लाभ झाला व वाचकांना दर्जेदार वृत्तपत्रे मिळाली. बदलत्या काळाबरोबर भारतीय भाषांतील पत्रकारिता यशस्वी होण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव आठवणीत राहील, अशा भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केल्या.

कधीही भरून न येणारे नुकसान
दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्रजी अग्रवाल अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वेळा त्यांच्याशी माझी विविध मुद्द्यांवर चर्चा होत असे. एवढ्या प्रचंड खपाच्या वृत्तपत्राचे मालक असूनही त्यांच्यात मुळीच गर्व नव्हता.  त्यांचे पाय कायमच जमिनीवर होते. सामान्य वाचकांविषयी ते नेहमीच अतिशय संवेदनशील होते. अग्रवाल यांच्या कर्तृत्वामुळेच भास्कर वृत्तपत्र समूह केवळ भारतच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम ठरला आहे. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टी तसेच सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही, असे माेठे नुकसान झाले आहे, अशा भावना अाैरंगाबादेतील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केल्या.

भारतातील माध्यमसम्राट निवर्तले
अमेरिकेतील माध्यमसम्राट रुपर्ड मर्डोक यांच्याप्रमाणेच स्व. रमेशचंद्रजी अग्रवाल हे भारतातील माध्यम सम्राट होते.  महाराष्ट्रातही दिव्य मराठीच्या रूपाने भास्कर समूह विस्तारला.  तटस्थ पत्रकारितेचा नवा पायंडा ‘दिव्य मराठी’ने सुरू केला. निवडणूक काळात पेड न्यूज प्रसिद्ध न करणारे ‘दिव्य मराठी’ एकमेव वृत्तपत्र आहे. स्व. रमेशचंद्रजी हे मालक होते, पण दैनिकात नेहमी वाचकांची मर्जी चालली. स्व. रमेशचंद्रजी आणि माझ्या भेटी नाशिकला ‘दिव्य मराठी’च्या वर्धापनदिनी झाल्या होत्या. ते माझ्याशी आस्थेवाईकपणे बोलत. आज त्यांना श्रद्धांजली वाहताना मला अतिव दुःख झाले, अशा भावना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केल्या.  

माध्यम क्षेत्राचे माेठे नुकसान 
रमेशचंद्र अग्रवाल यांच्या अाकस्मिक निधनाने माध्यम समूह व भास्कर समूहाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले अाहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अग्रवाल यांनी नवा अायाम निर्माण करून भास्कर समूहाला उत्तुंग यशाेशिखरावर नेले. सामाजिक कार्यामध्येही त्यांचे उल्लेखनीय याेगदान हाेते. भास्कर समूह, अग्रवाल परिवाराच्या दु:खात अापणही सहभागी अाहाेत, अशा भावना काँग्रेस कमिटीचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी  मोहन प्रकाश यांनी व्यक्त केल्या.

भोपाळमधील बाजार दुपारपर्यंत बंद...
- रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्यानिधनाच्या पार्श्वभूमीवर भोपाळ चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व व्यापारी संघटनांची तातडीने बैठक घेतली. रमेशचंद्रजी यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्‍यात आले. तोपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा बहुमताने निर्णय घेण्यात आला होता.
- बैठकीत सराफा असोसिएशन, कापड व्यावसायिक संघटना, मप्र आडद व्यापारी संघटना, भोपाळ किराणा व्यापारी महासंघ, अखिल भारतीय उद्योग व्यापार मंडळ, न्यू मार्केट व्यापारी महासंघ, लोखंड व्यावसायिक संघटना, भोपाळ पेट्रोल पंप डीलर असोसिएशन, बैरागड कापड व्यावसायिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...
> अविश्रांत रमेशजी, जे कधीच थांबले नाहीत...
> राजकीय व उद्योग जगतातील मान्यवरांनी व्यक्त केला शोक
> व्हिडिओमधून पाहा... रमेशचंद्र अग्रवाल यांचा जीवनप्रवास!
बातम्या आणखी आहेत...