आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात‍ प्रथम प्रयोग; मत देणार नसाल तर तसे सांगावे लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- आगामी निवडणुकांमध्ये मतदान न करण्याची तुमची इच्छा असली तरीही त्याबाबतची तुम्हाला केंद्रावर जाऊन संबंधित निवडणूक अधिकार्‍याला तशी सूचना द्यावी लागेल. यापैकी कुठल्याच उमेदवारास मी मत देऊ इच्छित नाही, असे तुम्हाला सांगावे लागेल. त्यानंतर अधिकारी तुम्हाला एक फॉर्म देईल. तो भरून दिल्यानंतर अधिकारी त्यावर स्वाक्षरी करेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांमध्ये निवडणूक आचरण नियम (कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल)-1961चा प्रसार व प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी हे मान्य करतात की बहुतांश लोकांना या नियमाची माहितीच नाही. कारण आतापर्यंत त्याच्या प्रचाराकडे फारसे लक्ष देण्यात आलेलेच नाही. त्यामुळे यंदापासून आयोगाने त्याच्या प्रचार आणि प्रसारावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक आयोगांना या नियमाच्या प्रसार - प्रचारावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य प्रदेशात निवडणुकांपासून त्याची सुरुवात होणार असून त्यानंतरच्या इतर निवडणुकांतही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राजकीय पक्षांवर नैतिक दबाव
या निगेटिव्ह मतदानामुळे निवडणूक प्रक्रियेवर थेट परिणाम होणार नाही, परंतु राजकीय पक्षांवर त्याचा एक प्रकारचा नैतिक दबाव निर्माण होईल. मतदार ज्या उमेदवाराला नाकारतील, अशा उमेदवारांना तिकीट देऊन रिंगणात न उतरवण्याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. याशिवाय याचा आणखी एक लाभ म्हणजे एखाद्याने मत नाही दिले तर त्याच्या नावे दुसरी एखादी व्यक्ती बोगस मतदान करू शकणार नाही. मतदारांनी याचा उपयोग केला तर बनावट मतदानालाही आळा बसेल.

ईव्हीएममध्ये असेल तरतूद
निवडणूक आयोगाने 10 डिसेंबर 2001 मध्ये केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. त्यात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) ‘यापैकी कुणीही पसंत नाही’ असे मत नोंदवण्याचे बटण बसवावे, असे म्हटले होते, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. असे बटण असेल तर त्यामुळे नकारात्मक मतदानातही मतदाराची ओळख गुप्त राहील.

अशी असेल प्रक्रिया
मतदान न करण्यास इच्छुक व्यक्तीला मतदान केंद्रावर बोटांवर शाई लावल्यानंतर निवडणूक अधिकार्‍यास सांगावे लागेल की मी मतदान करू इच्छित नाही. त्यानंतर पीठासीन अधिकारी त्याची स्वतंत्र नोंद घेईल. मतदार यादीत त्याच्या नावापुढे अधिकारी संबंधित मतदाराने उमेदवारांविषयी अनिच्छा व्यक्त केली आहे, अशी नोंद करेल. अधिकारी संबंधित मतदाराला फॉर्म - 17 उपलब्ध करून देईल. यात मतदाराला त्याची माहिती देऊन तो मतदान करण्यास इच्छुक नसल्याचे नमूद करावे लागेल. पीठासीन अधिकारी मतदाराने मत देण्यास नकार दिल्याची नोंद करेल. त्यावर दोघांच्याही स्वाक्षर्‍या असतील.