इंदूर - नव्या वर्षात सूर्य आणि चंद्राची जगात चार रोमांचकारी ग्रहणे दिसणार आहेत. यापैकी फक्त एकच ग्रहण भारतात दिसणार असून तेसुद्धा देशातील काही मर्यादित भागातच दिसण्याची शक्यता आहे. भारतातील ज्योतिष्यांनी रविवारी भारतीय संदर्भाच्या कालगणनेनुसार ही माहिती दिली. त्यांच्या मते, 2014 तील अद्भुत खगोलीय घटनांना 15 एप्रिलपासून सुरुवात होईल. परंतु याची सुरुवात भारतातून नव्हे तर जगातील इतर ठिकाणांहून होईल. ज्योतिष्यांनुसार 29 एप्रिल रोजी वलयाकार सूर्यग्रहण दिसणार आहे, परंतु ते भारतात दिसणार नाही. या वेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील लपंडाव खगोलप्रेमींना बघायला मिळेल.
8 ऑक्टोबर 2014 रोजी पूर्ण चंद्रग्रहण दिसणार असून येत्या वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण राहील. मात्र, हे चंद्रग्रहण भारतातील पूर्वोत्तर भागातच बघायला मिळण्याची शक्यता आहे. 23 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असेल आणि ते 2014 तील शेवटचे ग्रहण राहील. हे ग्रहणसुद्धा भारतात बघायला मिळणार नाही. 2013 मध्ये पाच ग्रहणे बघायला मिळाली. यातील शेवटचे ग्रहण 3 नोव्हेंबरला झाले.