आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशच्या नेहाचा बालविवाह कोर्टात रद्द, आयपीएस होण्याची महत्त्वाकांक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदसौर - बालविवाहाविरुद्ध मध्य प्रदेशच्या १७ वर्षीय नेहाला अखेर न्याय मिळाला. न्यायालयाने तिचा बालविवाह रद्द केला आहे. तिने न्यायालयात दाद मागितल्याने तिच्या पालकांनी तिला घरातून हाकलून दिले होते. तिने आधार केंद्राची मदत घेतली. त्यानंतर मोठ्या भावाने तिची बाजू घेतली. आता नेहाला न्याय मिळाला आहे.
मंदसौरची नेहा कछावा सध्या ११ वीत शिकत आहे. १० मे २०११ रोजी तिचा विवाह महेंद्रशी झाला होता. विवाहाच्या वेळी ती ७ व्या इयत्तेत शिकत होती. तिला त्या वेळी विवाहाचे संदर्भही कळले नव्हते. त्यानंतर लाडो अभियानांतर्गत तिच्या शाळेत तिला बालविवाह अपराध असल्याचे प्रथमच कळले. महिला विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालविवाहाची माहिती दिली, तेव्हा शाळेत तिला याचे ज्ञान झाले.

२०१५ मध्ये सासरची मंडळी तिला घ्यायला आली. नेहाने जाण्यास नकार दिला. पोलिसांना यासंबंधी सूचना देण्यात आली. नाराज झालेल्या आईवडिलांनी तिला घरातून हाकलून दिले. १५ सप्टेंबरला कुटुंब न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. ४ नोव्हेंबर रोजी दोन्ही पक्षांच्या सहमतीने विवाह रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.

आई-वडील आणि आत्याने नेहाची इच्छा नसताना तिचा विवाह २०११ मध्ये लावून दिला. तिला बालविवाहविषयी ज्ञान नव्हते. मात्र समज आल्यावर तिने याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली.
नातलगांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने निश्चयी वृत्तीने याविरुद्ध लढा दिला. नेहाचे वकील दशरथसिंह यांनी अशा प्रकारचे हे जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे सांगितले.

समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी सक्रिय
बंजारा समाजात बालवयातच विवाह लावले जातात, असे नेहा सांगते. समाजातील या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी काम करणार असल्याचा निश्चय तिने केला. आयपीएस अधिकारी होण्याची तिची इच्छा आहे.
भावाने दिला आधार
आई-वडिलांनी घरातून हाकलून दिल्यानंतर नेहाने आश्रयगृहाचा पर्याय निवडला. मोठा भाऊ राकेशने साथ दिली.

समाजाने केला विरोध
नेहाचे वडील रामचंद्र यांची चहाची टपरी आहे. आर्थिक परिस्थितीमुळे नेहाचा विवाह केल्याचे त्यांनी सांगितले. समज आल्यावर नेहाने बालविवाहाला विरोध केला. समाजात बदनामी होईल, असे पित्याला वाटले. त्यांनी नेहाला विरोध केला. गरिबांना समाज प्रथांचे पालन करावे लागते. अन्यथा बदनामी होते, असे रामचंद्र म्हणतात.