आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्कम भारतातील बँक खात्यांत, मेसेज पाकमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - लॉटरी लागल्याचे ई-मेल आणि एसएमएसद्वारे सांगून लोकांची फसवणूक करणार्‍या एका टोळीचा मध्य प्रदेश सीआयडी चमूने पर्दाफाश केला आहे. या टोळीची सर्व सूत्रे पाकिस्तानातून हलत होती. विशेष म्हणजे फसलेल्या व्यक्तीने त्यांच्या भारतीय खात्यात रक्कम जमा करताच त्याचा संदेश पाकिस्तानमध्ये दडून बसलेल्या टोळीच्या अन्य सदस्यांना जायचा आणि नंतर ती रक्कम भारतातच हवालाच्या माध्यमातून वितरित केली जायची.

सीआयडीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला टोळीतील सदस्य ब्रिजेश मागील दोन वर्षांपासून पाकिस्तानच्या काही लोकांसोबत मिळून ईमेल तसेच संदेशाच्या माध्यमातून लोकांना लॉटरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे काम करत होता. तो प्रत्येक आठवड्यात बँकेच्या विविध खात्यांमधून किमान 4-5 लाख रुपये काढून अन्य साथीदार धर्मेंद्र प्रजापतीला द्यायचा. प्रजापती ही रक्कम हवालाच्या माध्यमातून इंदूर व अहमदाबादला पाठवायचे काम करायचा. ब्रिजेश दररोज किमान 8-10 वेळा पाकमधील सहकारी जावेद व इशाकसोबत बोलायचा, असे त्याने सांगितले. पाकमधील साथीदारांच्या सांगण्यावरून भारतातील सर्व सूत्रे हलवली जायची, असे त्याने कबूल केले आहे. आरोपींकडून आणखी बरीच माहिती मिळू शकते, असे सीआयडीकडून सांगण्यात आले आहे.

लॉटरीच्या माध्यमातून फसवणूक
या टोळीचे पाकमधील सदस्य इंटरनेटच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांना ई-मेल व एसएमएस पाठवायचे. संबंधित व्यक्तीला लाखो अमेरिकन डॉलर्सची लॉटरी लागल्याचे सांगून संबंधिताला दिलेल्या ई-मेल आयडीवर किंवा फोन क्रमांकावर संपर्क साधायला सांगितले जायचे. त्यानंतर संबंधितास लॉटरीसाठी प्रोसेसिंग शुल्क, कस्टम ड्यूटी, बँक क्लिअरन्स आदींच्या नावाखाली 1 ते 5 लाख रुपये बँक खात्यात डिपॉझिट करायला सांगितले जायचे. यासाठी एखाद्या प्रतिष्ठित बँकेचा खाते क्रमांक दिला जायचा. या खात्याचे एटीएम कार्ड टोळीचे भारतातील सदस्यांकडे असायचे. बक्षिसाच्या लालसेने व्यक्तीने संबंधित बँक खात्यात रक्कम जमा केल्याचा पाकमधील सदस्यांकडे अलर्ट पोहोचताच भारतातील सदस्य ताबडतोब एटीएमद्वारे ती रक्कम काढून घ्यायचे.

आरोपींकडे सापडलेले एटीएम कार्ड
सीआयडीच्या चमूने पंकज ऊर्फ ब्रिजेशजवळून विविध व्यक्तींच्या नावे असलेले सुमारे 15 एटीएम कार्ड हस्तगत केले आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकसारख्या दिग्गज बँकांमधील खात्यांचे एटीएम कार्ड सामील आहेत.