भोपाळ/ नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या ‘हवाबाज’ टोमणेबाजीचा गुरुवारी चांगलाच समाचार घेतला. विरोधक का हैराण आहेत हे मला माहीत आहे. काळ्या पैशाबाबत आम्ही कठोर कायदा केल्याने ‘हवालाबाजां’ना त्रास होत आहे. हवालाबाजांची जमात लोकशाहीमध्ये अडथळे आणू पाहात आहे. परंतु लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे मोदी म्हणाले.
आम्ही जन-धनची खाती उघडली आणि गॅस सिलिंडरची सबसिडी थेट खात्यात जमा करण्यास प्रारंभ केला. त्याचा परिणाम असा झाला की, मागच्या सरकारमध्ये गॅस सबसिडी घेणारे ५ कोटी लोक आता सापडत नाहीत. ही हवालाबाजांची जमात दरवर्षी देशाचे १९ हजार कोटी रुपये सबसिडीच्या नावाखाली खाऊन टाकत होती. आता तेच हवालाबाज आम्हाला हिशेब मागत आहेत, असे भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोदी म्हणाले.
संसद अधिवेशनावर राजकीय सफाई
मोदी म्हणाले, एकेकाळी संसदेत भाजपचे दोनच खासदार होते. तेव्हा राजीव गांधी ‘बस्स, दोन किंवा तीन... चला ठीक आहे’ असे म्हणून आमची खिल्ली उडवत होते. आता काँग्रेस ४०० वरून ४० जागांवर आली आहे. आम्ही पराभवातून धडा घेतला. संसदेचे अधिवेशन गुंडाळायला भाग पाडले नाही. विरोधी पक्ष देशाच्या आशा-आकांक्षा समजून घेतील असे वाटले होते. सर्व पक्षांची सहमती होती परंतु एक ऐकायलाच तयार नाही. लोकशाहीपेक्षा आमचा अहंकार श्रेष्ठ आहे का? हेच मला समजत नाही. आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. त्यामुळे जड अंत:करणाने अधिवेशन संस्थगित करावे लागले.
आधी स्वत:कडे पाहा, मग हवालाबाज म्हणा
आम्हाला हवालाबाज म्हणण्याआधी स्वत:कडे पहावे, अशा शब्दांत सोनिया गांधींनी मोदींवर पलटवार केला. ललितगेट व व्यापमं घोटाळ्याबाबत मोदी गप्प का आहेत? असे त्या म्हणाल्या. तर कोण खरा दगाबाज, हे जनता ठरवेल. काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख टाकण्याच्या आश्वासनाचे काय झाले ? जनतेला या हवाबाजीचे उत्तर हवे आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.
शेतकऱ्यांचे अच्छे दिन कधी येणार? : राहुल
ओरिसाच्या बरगड जिल्ह्यात राहुल गांधींनी शेतकरी बचाओ रॅली काढली. शेतकऱ्यांचे अच्छे दिन कधी येणार हे मोदींनी सांगावे. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत आणि अहंकाराची बाधा झालेले सुटाबुटातील मूठभर बड्या घराण्यांचे हित जोपासण्यातच मश्गुल झाले आहे, अशी टीका राहुल यांनी केली. एनडीए सरकार शेतकऱ्यांशी भेदभाव करत आहे.त्यांना कुठल्याच सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.