भोपाळ - येथील एका हिंदू महिलेने एका मुस्लिम महिलेवर तिच्या पतीसोबत लग्न करुन त्याचे धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप केला आहे. हिंदू महिलेने हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. महिलेने आरोप केला आहे, की तिच्या पतीने तिच्या चार वर्षांच्या मुलीचेही धर्मांतर केले आहे.
इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, भोपाळ येथील रहिवासी अमृता अडवाणी यांनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. अडवाणींचा आरोप आहे, की तिचे पती अमित (28) याला फिरदौस (35) नावाच्या महिलेने महागड्या भेटवस्तू देऊन आकर्षित केले. अमित आणि फिरदौस तिच्या चार वर्षांच्या मुलीला घेऊन 25 जूनपासून बेपत्ता आहेत. त्यानंतर अमृता अडवाणी यांनी पोलिसांशी संपर्क केला, मात्र त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. अमृताला अमितवर तिच्या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करायचा होता. त्यावर पोलिसांनी मुलगी तिच्या वडीलांसोबत गेली असल्याने, तिची फक्त हरवल्याची तक्रार दाखल करता येईल. त्यानंतर अमृताने महिला आयोगाचे दार ठोठावले. आयोगाने पोलिसांना या प्रकरणी तपास करण्यास सांगितले आहे. आयोगाचे म्हणणे आहे, की हे एक प्रेम प्रकरण असण्याची शक्यता आहे. अमितने मुलीला सोबत घेऊन जायला नको होते.
मुलगी दिली आईच्या ताब्यात
अमित आणि फिरदौस अहमदाबाद जवळील सारखेज येथे भाड्याच्या घरात राहात होते. आयोगाच्या सांगण्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि शुक्रवारी त्यांना भोपाळ येथे आणले आहे. पोलिस अधिक्षक अरविंद सक्सेना यांनी मुलीला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, मित आणि फिरदौस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले आहे.