भोपाळ- माझा जन्म झाला तेव्हा कुणीतरी मलाही अनावश्यक ओझे असे संबोधले होते, अशा भावना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केल्या आहेत.
स्त्री भ्रुण हत्या या विषयावर एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या, की मी हे पहिल्यांदा शेअर करीत आहे. माझा जन्म झाला तेव्हा एका व्यक्तीने माझ्या आईला सांगितले होते, की मुलगी अनावश्यक ओझे आहे. तिला ठार मारले पाहिजे. परंतु, माझी आई धैर्यवान होती. तिने त्या व्यक्तीचे ऐकले नाही. त्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभी राहू शकले. अशा स्वरूपाच्या घटना संपुष्टात यायला हव्यात. केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करणार आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या, की जर एखाद्या मुलीला शिक्षण दिले तर ते केवळ तिच्यापुरते मर्यादित राहत नाही. तिच्या माध्यमातून कुटुंबाला शिक्षण मिळते. कुटुंबाच्या माध्यमातून देश घडविण्यास हातभार लागतो. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले जाणार आहे. यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेली भिन्नभिन्न शिक्षण पद्धती यात समानता आणता येईल.