हैदराबाद - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) तरुणांना भरतीसाठी फूस लावल्याच्या आरोपावरुन संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) एका भारतीय महिलेची हकालपट्टी केली आहे. मायदेशी परतताच तिला शुक्रवारी हैदराबाद विमानतळावर अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ३७ वर्षीय महिलेचे नाव अफशां जबी ऊर्फ निकी जोसेफ असून ती हैदराबादची राहणारी आहे.
अफशां जबी सोशल मीडियावर तरुणांना आयएसमध्ये भरती होण्यासाठी फूस लावत होती. त्या वेळी स्वत:ला ती ब्रिटनची नागरिक असल्याचे सांगत असे. तिला यूएईने पती व मुलांसह हैदराबादला पाठवून दिले. पोलिसांनी विमानतळावर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, अफशांचे नाव आयएसमध्ये भरती होण्यासाठी गेलेला युवक सलमानची चौकशी करतेवेळी पुढे आले होते. त्याला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अफशांचा शोध घेतला जात होता. तपासात ती भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट झाले होते.
सौदी, अमेरिकेत नेटवर्क : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफशां लहानपणीच अबुधाबीला गेली होती. नंतर ती शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी हैदराबादला परत आली होती. तेथून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिने देवेंद्र कुमार ऊर्फ मुस्तफासोबत निकाह केला.
महाराष्ट्रातील तरुणही अफशांच्या जाळ्यात
सलमान मोहिउद्दीनच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्याने दुबईत राहणाऱ्या निकी जोसेफ ऊर्फ अफशांसोबत मिळून अनेक बनावट फेसबुक अकाउंट सुरू केले होते. निकीने सलमानला सिरियामध्ये जाण्यासाठी दुबईला बोलावून घेतले होते. तो तिला अमेरिकेतही भेटला होता. दोघांनी सोशल मीडियावर अनेक युवकांना आयएसमध्ये भरती होण्यासाठी फूस लावली होती. त्यात महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक व बिहारमधील तरुणांचा समावेश आहे.