इंदूर - १३ वर्षांपूर्वी भारतातून चुकून पाकिस्तानात पोहोचलेली तरुणी गीताने शनिवारी इंदूर येथील मूकबधिर मुलांसोबत इशाऱ्यांद्वारे सांकेतिक भाषेत संवाद साधला. हजारो किलोमीटर अंतरावरील कराची शहरात असलेल्या गीताला ऑनलाइन बोलण्यातून मुलांनी सांकेतिक भाषेत अनेक प्रश्न विचारले. तिनेही त्यांच्या प्रश्नांना हातवारे करूनच उत्तरे दिली. तेथे खाणे-पिणे कसे आहे, कपडे कसे घालायला मिळतात, काय काम करावे लागते, असे अनेक प्रश्न मुलांनी गीताला विचारले. गीतानेही आपण रस्ता चुकल्याने पाकिस्तानात कसे पोहोचलो, लाहोरला पोहोचल्यानंतर आपल्याला कुठल्या परिस्थितीत राहावे लागले, याची कहाणी सांगितली. भारतात परतल्यानंतर बजरंगी भाईजानला (सलमान खान) भेटण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
येथील आनंद मूकबधिर संस्थानमधील मुले सकाळी १०.३० वाजता तुकोगंज ठाण्यात पोहोचले होते. त्यांच्या चेहऱ्यावर गीताशी बोलण्याबाबतची उत्सुकता व आनंद दिसत होता. कराचीहून गीताने बिहारमध्ये आईवडिलांचे हालहवाल जाणून घेतले. मुले गीताला म्हणाली, तू परत येणार या वृत्ताने आम्ही खुश आहोत.