इंदूर/खंडवा - उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे शुक्रवारी एका घरात बॉम्ब तयार करताना स्फोट झाला. यात खंडवा जेलमधून 1 ऑक्टोबर 2013 रोजी पळून गेलेल्या सिमीच्या दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्फोटानंतर उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबीची टीम सक्रिय झाली आहे. तपासादरम्यान त्या खोलीतून मिळालेली ओळखपत्र आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन खंडवा जेलमधून पळून गेलेले दहशतवादी हेच असल्याचे मानले जात आहे. त्यांचे नाव एजाजूद्दीन, अस्लम अय्यूब, जाकिर बदरुल, अमजद रहमान, महेबूब आणि सलीक असल्याचे सांगितले जात आहे.
बिजनौरच्या जाटान मोहल्ल्यात गेल्या चार महिन्यांपासून हे सर्व दहशतवादी नाव बदलून राहात होते. पोलिसांनी घटनास्थळाहून 9 एमएमची एक पिस्तूल, लॅपटॉप, छोटे गॅस सिलिंडर,
मोबाइल, सीम कार्ड, बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि तीन ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. बिजनौरचे पोलिस अधिक्षक सत्यंद्रकुमार सिंह यांनी सांगितले, की घटनास्थळी सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे स्पष्ट झाले आहे, की हे खंडवा जेलमधून फरार झालेले दहशतवादीच आहेत. उत्तर प्रदेशात मोठी दहशतवादी कारवाई करण्याच्या विचारात ते होते. बिजनौर पोलिसांनी मध्यप्रदेश एटीएसशी संपर्क केला होता. त्यांनी देखील सीसीटीव्ही फुटेज आणि आयडी पाहून हे तेच दहशतवादी असल्याची पुष्टी केली आहे.