आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..आता वाघांच्या गर्दीमुळे काळजी; पन्ना प्रथमच मोठा पेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पन्ना- पाच वर्षांपूर्वी जेथे वाघ दिसतही नव्हते, त्या पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या आता 16 पर्यंत गेली आहे. हे व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे यश आहे. तथापि, या यशामुळे तज्ज्ञांपुढे दोन प्रश्न उभे राहिले आहेत. बांधवगड, कान्हा आणि पेंचमधून येथे ज्या पाच वाघ-वाघिणींना आणले होते, त्यांनी दहा पिले दिली. यापैकी 9 नर आहेत आणि एक मादी. हे सर्व वाघ एकमेकांशी भांडून मृत्युमुखी पडतील, ही एक समस्या आहे. 576 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात आणखी किती माद्यांना प्रजननासाठी आणले जाऊ शकते, ही दुसरी समस्या.

छत्रपूर आणि पन्ना जिल्ह्यांत केन नदीच्या काठावर असलेल्या पन्ना व्याघ्र अभयारण्याला सन 2008 मध्ये व्याघ्ररहित क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. त्या वेळी या अभयारण्यात वाघांचे पुनर्वसन कसे करता येईल, याविषयी विचारमंथन सुरू झाले. दिल्लीतील व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, डेहराडूनची वन्य प्राणी संस्था आणि इतर तज्ज्ञांमध्ये वाघांच्या स्थलांतरावर एकमत होत नव्हते. बराच काथ्याकूट झाल्यानंतर मार्च 2009 मध्ये बांधवगडमधून एक (टी 1) आणि कान्हामधून एक (टी 2) अशा दोन वाघिणी पन्नामध्ये आणल्या गेल्या. एक वाघ पन्नामध्ये उरला आहे, असे त्या वेळी मानले गेले. प्रत्यक्षात तेथे एकही वाघ शिल्लक नव्हता. मग पुन्हा पेंच राष्ट्रीय उद्यानातून नोव्हेंबर 2009 मध्ये एक वाघ (टी 3) आणून त्याला पन्ना अभयारण्यात सोडण्यात आले. आणखी दोन वाघीण बहिणींना कान्हातून आणले गेले. 2010 मध्ये टी 4 आणि 2011 मध्ये टी 5 आणल्या गेल्या. आता या पाच वाघ-वाघिणी धरून पन्नातील वाघांची संख्या 16 झाली आहे. वाघीण आपल्या बछड्याला सुमारे 18 महिने स्वत:जवळ ठेवते. या काळात ती बछड्याला शिकार करणे, मांस खाणे, धोक्यांची ओळख करून देणे म्हणजेच जगण्याचे प्रशिक्षण देऊन सोडून देते. प्रत्येक वाघाचा जंगलात स्वत:चा असा इलाखा असतो, जो 50 ते 75 किलोमीटरपर्यंत असू शकतो. त्या इलाख्यात तो दुसर्‍या वाघाला कधीच शिरू देत नाही. अशा परिस्थितीत पन्नामध्ये दिसामासाने वाढत चाललेल्या वाघांनी त्यांचे इलाखे निश्चित केले, तर त्यांना किमान 750 चौरस किमी जमीन लागेल. प्रत्यक्षात हे अभयारण्य 576 चौ. किमीचे आहे.

वाघ-वाघिणींचे समसमान प्रमाण राखण्यासाठी आणखी काही वाघिणींची गरज आहे, असे अभयारण्याचे संचालक आर.एस. मूर्ती यांचे मत आहे. 16 पैकी 11 वाघ आणि 5 वाघिणी असतील, तर काही वर्षांतच आपसातील भांडणांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ डॉ. एच.एस. पाबला यांच्या मते काही वाघांना पन्नामधून इतरत्र हलवावे लागेल. यातून वाघांमध्ये संघर्ष होणार नाही आणि त्यांची संख्याही वेगाने वाढेल.