आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंपाच्या भेटीसाठी व्याकूळ मोतीने तोडली अडथळ्यांची भिंत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- गेल्या 32 वर्षांपासून प्रेमाच्या आड येणारी भिंत जमीनदोस्त करत मोतीने गुरुवारी चंपाची भेट घेतली. इंदूरच्या प्राणिसंग्रहालयातील ही घटना. येथे मोती नावाचा हत्ती गेल्या 32 वर्षांपासून साखळदंडात जखडलेला आहे. शेजारच्या खोलीत असलेल्या चंपा हत्तिणीलाही तो भेटू शकत नव्हता.

न्यायालयाच्या आदेशानुसार या हत्तींना मुक्त अभयारण्यात सोडण्याची तयारी झाली, म्हणून मोतीची साखळी मंगळवारी रात्री 12 फूट सैल करण्यात आली. याचा फायदा घेत मोतीने खोलीची भिंत पाडून चंपाची भेट घेतली. व्यवस्थापनानेही मोतीचा रागरंग पाहून आडकाठी केली नाही. रात्री मोती खोलीत येऊन झोपला, पण दिवस उजाडताच त्याने उरलीसुरली भिंतही पाडून टाकली आणि चंपाच्या खोलीत जाऊन गुजगोष्टी केल्या.

मोतीची कहाणी : मोती दंगेखोर म्हणून ओळखला जातो. सुमारे 15 वर्षांपूर्वी लहान मुलांना त्याच्या पाठीवर बसवून फिरवले जात असे. दीड दशकापूर्वी हा दिनक्रम बंद करण्यात आला. त्यानंतर 18 जून 2006 रोजी त्याची साखळी सोडली, पण आठवडाभरातच त्याने माहुताला जखमी करून प्राणी संग्रहालयात तब्बल 12 तास धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून त्याला साखळदंडाने जखडलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तो डॉक्टर किंवा माहुतालाही जवळ फिरकू देत नव्हता.

राग निवळला : भिंत तोडून चंपाला भेटायला गेलेल्या मोतीने तिला काहीही इजा पोहोचवली नाही. त्यामुळे त्याला आडकाठी न आणता चंपाला भेटू देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचे संग्रहालयाचे प्रभारी डॉ. उत्तम यादव यांनी सांगितले. रात्री चंपाला भेटल्यावर त्याने सकाळी कर्मचार्‍यांना अंघोळ घालू दिली, यावरून मोतीचा राग निवळल्याचे जाणवले. अभयारण्यात पाठवण्यापूर्वी मोतीची साखळी हळूहळू पूर्णपणे काढून टाकणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.