इंदूर- गुजरात कदाचित विसरले असाल, पण मुजफ्फरनगर तर विसरू नका, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) ज्येष्ठ नेते प्रवीण तोगडिया यांनी मुस्लिमांना धमकावले आहे. तोगडियांच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे.
इंदूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना तोगडियांनी सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेवेळी भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देऊन मुस्लिमांना धमकी दिली. हिंदूंच्या सौजन्याला तुम्ही भ्याडपणा समजू नका. मुजफ्फरनगर किायम लक्षात ठेवा, हा मुस्लिमांना माझा इशारा आहे असे तोगडिया म्हणाले. अमरनाथ यात्रेकरूंवर यापुढेही हल्ले सुरू राहिल्यास त्याची देशभर प्रतिक्रिया उमटेल. दगड-विटा घेऊन हिंदू रस्त्यावर उतरला, तर त्याची जबाबदारी यात्रेकरूंवर हल्ला करणार्यांचीच असेल. हिंदुस्थानातील कानाकोपर्यातून, गावागावांतून हजारो यात्रेकरू तीर्थयात्रेला गेले आहेत. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे उत्तर म्हणून गावातील त्यांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही तोगडियांनी दिला. गतवर्षी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे जातीय दंगली झाल्या होत्या.