इंदूर - लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून सुरत येथे तुरुंगात असलेला आरोपी नारायण साईवर त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर नोटीस बजावण्यात आली असून त्याला २० नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नारायण साईची पत्नी जानकीने हे प्रकरण दाखल केले आहे.
त्यात म्हटले आहे की, नारायण आसाराम हरपलानी याच्यासोबत आपला विवाह २२ मे १९९७ मध्ये झाला होता. त्यानंतर मी सासू लक्ष्मीसह अहमदाबादच्या महिला आश्रमात राहून त्यांची देखभाल करत होते. विवाहानंतर नारायण आश्रमातील साधिकांसोबत सत्संगाच्या नावावर विविध ठिकाणी फिरत राहिला. त्याचे चारित्र्य चांगले नव्हते. त्याला विरोध केल्यानंतर त्याने माझा शारीरिक व मानसिक छळ केला. जानकीने पतीकडून आपल्याला दरमहा ५० हजार रुपये पोटगी मिळावी, असा दावा दाखल केला आहे.