आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, काय आहे सौरव गांगुली अध्यक्ष होण्यामागचे वास्तव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- बंगाल क्रिकेटचा "दादा' ऊर्फ सौरव गांगुली आणि "दीदी' अर्थात ममता बॅनर्जी यांच्यापैकी कोणी मास्टर स्ट्रोक लगावला हे सांगणे कठीण आहे. मात्र, फायदा दोघांचाही होत असल्याचे दिसत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी बंगालमधील सर्वात लोकप्रिय चेहरा, सौरवला बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष केल्याचे मानले जाते. दुसरीकडे, ममता यांनी सौरवचा मोठ्या खुबीने वापर केल्याचे म्हटले जाते. बंगाल क्रिकेट संघटनेत निवडणूक झाली असती तर त्याचा पराभव झाला असता याची जाणीव सौरवला होती. त्याचे कारण म्हणजे सौरवचा संबंध केवळ दालमियांशीच होता.

अध्यक्ष पायउतार झाल्यावर किंवा त्याचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत निवड होणे बंधनकारक असते. नियमानुसार दोन महिन्यांच्या आत मतांचे गणित सौरवच्या विरोधात जाण्याचा धोका होता. त्यामुळे त्याआधीच अध्यक्ष होण्यात सौरवने चतुराई दाखवली. अनुभवी चित्रक मित्रा किंवा विश्वरूप डे यांचे अध्यक्ष होणे जवळपास निश्चित होते. सौरवने जगमोहन दालमियांच्या निधननानंतर तयार झालेल्या भावनिक वातावरणाचा लाभ उठवत ममतांना वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी अध्यक्षपदाची घोषणा करावी, अन्यथा दालमियांच्या कष्टाचे चीज होणार नाही, हे सौरवने पटवून दिले. खेळाडू म्हणून सौरवची जगभर लोकप्रियता आहे. त्याचप्रमाणे रिअॅलिटी शो "दादागिरी'ची बंगालच्या घराघरात वाहवा होत आहे. ममता यांनी राज्य सचिवालयात अनेक नेते व मंत्र्यांच्या उपस्थितीत सौरवच्या अध्यक्षपदाची, तर दालमियापुत्र अभिषेक यांच्या संयुक्त सचिवपदाची घोषणा केली. यानिमित्ताने ममतांनी एका बाणात दोन पक्षी मारले. त्यांनी सौरवची लोकप्रियता स्वत:शी जोडली. यातून त्या क्रिकेटमध्ये सक्रिय होऊ शकल्या. अभिषेक दालमिया यांना पद देऊन त्यांनी बंगालमधील मारवाडी समाजाला खुश केले. दालमिया आपल्या समाजात लोकप्रिय होते. त्यामुळे मारवाडी मते ममतांच्या पारड्यात निश्चितपणे जातील. मात्र, यातील आश्चर्यजनक बाब म्हणजे सौरवच्या अध्यक्षपदाचे वृत्त बंगाल क्रिकेट संघटनेच्या विविध क्लबना वृत्तवाहिन्यांवरून कळले. खेळातील राजकीय नेत्यांच्या सहभागास दालमिया यांचा कायम विरोध होता. बंगाल क्रिकेट संघटनेत त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याला कधीही पद दिले नाही. ज्योती बसू आणि बुद्धदेव भट्टाचार्यसारखे प्रबळ मुख्यमंत्रीही त्यांच्यापेक्षा वरचढ ठरू शकले नाहीत. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दालमिया यांच्या निधनाच्या ४८ तासांनंतर राजकारण सुरू झाले. सौरव व अभिषेक यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी बंगाल क्रिकेट संघटनेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळायची आहे. संघटनेचे पदाधिकारी ममतांच्या हस्तक्षेपावर नाराज आहेत, मात्र दीदीपुढे सर्व गप्प आहेत.