आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरालिसिसला हरवणारा ८४ वर्षांचा तरुण चित्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाेपाळ - कला हाच कलाकाराचा श्वास असतो. मग किती संकटे येवोत वा व्याधींनी जगणे असह्य होवो, कलाकार कधीच मोडून पडत नाहीत. भाेपाळ शहरातील पेमा फत्या यांना हे वर्णन पूर्णपणे लागू होते. आयुष्यातील अनेक चढउतार हसतमुखाने लीलया पार करणाऱ्या या ८४ वर्षांच्या कलाकाराने पॅरालिसिसवरही मात केली आहे.
गत ७० वर्षांपासून ते आपल्या कल्पनांना कुंचल्यातून मूर्तरूप देत आहेत. पिथौरा हा चित्रकलेतील खूप जुना प्रकार आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातील भिल्ल बांधव पाऊस आणि पृथ्वीच्या संयोगातून ब्रह्मांडाची रचना झाल्याचे मानतात. पेमा फत्या अशांपैकीच एक आहेत. व्याधीवर मात करत ते स्वत: चित्र काढत तर आहेतच, शिवाय ही कला आपल्याबरोबरच संपू नये या भावनेतून अन्य कलाकारांना या कलेचे प्रशिक्षणही देत आहेत. सध्या अलिराजपूरजवळील भावरा गावातून ते शहरात आले आहेत. मध्य प्रदेश आदिवासी संग्रहालयात आयोजित पिथौरा चित्रकलेच्या कार्यशाळा आणि व्याख्यानासाठी त्यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.
शरीर पांगळे; मन ताजेतवानेच
पेमा सांगतात, १५ वर्षे उजव्या हातानेच अनेक प्रसंग चितारले. पण पॅरालिसिसमुळे उजवा हात आणि दोन्ही पाय लुळे पडले. काही दिवसांनी हुशारी आली; पण चित्र काढता येत नसल्यामुळे चैन पडेना. मग काय, डाव्या हाताने चित्र रेखाटण्याचा सराव सुरू ठेवला. कुडीत प्राण आहे तोपर्यंत कुंचला खाली ठेवणार नाही, हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत तरुणांना लाजवेल अशी चमक होती.