आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धवल यश: मॉरिशसला निर्यात केले पहिले टेहळणी जहाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/कोलकाता- भारताने शुक्रवारी नौदल टेहळणी जहाज निर्यात क्षेत्रातील पहिली ऑर्डर यशस्वीरीत्या पूर्ण केली. बरचुडा नावाचे हे अत्याधुनिक जहाज आता मॉरिशसच्या सागरी किनार्‍यांचे संरक्षण व टेहळणीचे काम करणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) ने कोलकाता येथे या जहाजाची निर्मिती केली आहे.

जीआरएसईने बरचुडा या जहाजाच्या निर्मितीमुळे आणखी एक कीर्तिमान प्रस्थापित केले आहे. निर्यात होणारे हे भारताचे पहिले जहाज ठरले आहे. याची ऑर्डर भारताला मार्च 2011 मध्ये मिळाली होती. साडेतीन वर्षांत (सप्टेंबर 2014) मध्ये त्याची पूर्तता मॉरिशसला करण्याची अट करारात होती; परंतु एक वर्ष आधीच भारताने हे जहाज मॉरिशसच्या नौदलाला सुपूर्द केले आहे. या जहाजाच्या जलावतरणाप्रसंगी ग्रुप कॅप्टन टी. के. सिंग यांनी सांगितले, मॉरिशसशिवाय इतर अनेक देशांकडूनही अशा टेहळणी जहाजासाठी ऑर्डर मिळाल्या आहेत व त्यावर सध्या काम सुरू आहे. जहाज जलावतरणप्रसंगी भारताचे मॉरिशसमधील उच्चायुक्त आर्यकुमार जुग्गेसार, मॉरिशस पीएमओ अधिकारी केओ फांग यांच्यासह भारतीय नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.

मैत्री पर्वातील मैलाचा दगड
हा दिवस भारत - मॉरिशसच्या मैत्री पर्वातील मैलाचा दगड ठरणार आहे. भारताकडून मिळालेले हे जहाज आमच्या नौदलासाठी खूपच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकते. आमची सेना व देशातील जनतेच्या वतीने भारताचे आभार.
- केओ फांग, मुख्य अधिकारी, पीएमओ, मॉरिशस

वैशिष्ट्ये व कार्य
स्टेट ऑफ द आर्ट मुख्य इंजिन : हे अत्याधुनिक इंजिन आहे. ते विविध प्र्रकारच्या इंधनावर चालू शकते. ते डिझेल, जैवइंधन, वायू व इथेनॉलवरही चालू शकते. नौदलाच्या युद्धनौकांमध्ये याचा वापर केला जातो. हे वातानुकूलित आहे.

उपयोग
०सागरी किनार्‍यांवर गस्त घालण्यासाठी, जवानांना रसद पुरवण्यासाठी
०चक्रीवादळ आल्यास बचावकार्य करण्यासाठी
०नौदलाच्या तुकडीसाठी छोटे कॅरिअर म्हणून
०सागरी चाचे, तस्करांना पकडणे, शॉर्क, व्हेलची शिकार रोखणसाठी