आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांनंतर ‘रोमिंग फ्री’ झाले बडवानी जिल्ह्यातील महादेव, नंदी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेतिया (बडवानी)- मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील मालकातर (खेतिया) येथील भगवान शिव नंदीचे हे मंदिर दहा वर्षांनंतर रोमिंग फ्री झाले आहे.

वास्तविक या मंदिराच्या चबुतऱ्यावर स्थापन करण्यात आलेले शिवलिंग मध्य प्रदेशात तर त्यासमोर विराजमान नंदी महाराष्ट्राच्या सीमा हद्दीत होता. यामुळे दोन्ही राज्यांतून येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अनेकदा अडचण होत असे. कारण, बहुतांश भाविकांकडे बीएसएनएलचेच कार्ड होते. ही अडचण ओळखून बीएसएनएलने हा भागच आता रोमिंग फ्री केला आहे. यामुळे यंदा शिवरात्रीदिवशी भक्तांची सुविधा झाली. २००५मध्ये या गावात मोबाइल सेवा सुरू झाली. येथे फक्त बीएसएनएलचेच टॉवर होते. यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या दोन्ही राज्यांतील भक्तांना रोमिंग चार्ज द्यावा लागत होता. बीएसएनएलचे जेटीओ जितेंद्र लाड यांनी सांगितले, ‘नोव्हेंबर २०१५ मध्ये हा भाग रोमिंग फ्री केला आहे. शिवाय, जवळच्या परिसरातील थ्रीजी टॉवरची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे.’ सध्या आणखी एका खासगी कंपनीच्या ग्राहकांची रोमिंगबाबत हीच अडचण आहे. हे मंदिर प्राचीन आहे. जेव्हा येथे हे गाव वसले तेव्हा गावकऱ्यांनी या मंदिराची स्थापना केली होती. तेव्हा येथे राज्याच्या सीमांचा प्रश्नच नव्हता. कालौघात राज्य, सीमा निर्माण झाल्या आणि हे मंदिर निम्मे महाराष्ट्रात तर निम्मे मध्य प्रदेशात गेले.

जिल्ह्यापासून ७० किमी दूर
जिल्हामुख्यालयापासून हे गाव सुमारे ७० किमी दूर आहे. या भागातील ग्रामपंचायत क्षेत्रही दोन भागांत विभागले असून यातील ७५ टक्के भाग महाराष्ट्रात तर २५ टक्के मध्य प्रदेशात आहे. सीमेवरील ७५ टक्के ग्रामपंचायत क्षेत्र शिरपूर (जि. धुळे) हद्दीत तर २५ टक्के भाग दोंदवाडा (जि. बडवानी) तहसीलच्या हद्दीत येताे.

२०लाख खर्चून जीर्णोद्धार
गावातील रमेश जायसवाल करणसिंह यांनी सांगितले, दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी दौरा करून निधी देण्याबाबत सहमती दर्शवली आहे.