आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जैनमधील मुक्कामाचा नेत्यांना धसका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ उज्जैनच्या महाकालचे दर्शन घेऊन केला. मात्र रात्री उज्जैनमध्ये मुक्काम करण्याचे कटाक्षाने टाळत त्यांनी इंदूरला प्रयाण केले. महाकालबाबत प्रसिद्ध असलेल्या आख्यायिकेमुळे चौहान यांनी येथील रात्रीचा मुक्काम टाळला. यापूर्वी ज्या राज्यकर्त्यांनी उज्जैनमध्ये रात्रीचा मुक्काम केला त्यांना आपले पद सोडावे लागले आहे, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

महाकालला उज्जैनचे अधिपती मानले जाते, त्यामुळे उज्जैनमध्ये रात्री फक्त एकच राजा मुक्काम करू शकतो. येथे महाकाल विराजमान असल्यामुळे अन्य राजे आपला रात्रीचा मुक्काम उज्जैनबाहेर करतात. आधीचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंग आणि उमा भारती यांनी उज्जैनमध्ये रात्रीचा मुक्काम केला होता, परंतु नंतर काही दिवसांच त्यांना खुर्ची गमवावी लागली. हा पूर्वेतिहास माहित असल्याने भीतीमुळेच शिवराजसिंह चौहान यांनीही उज्जैनमध्ये मुक्काम करणे टाळले. सिंधिया घराण्यातील लोक जेव्हा येथे दर्शनासाठी यायचे तेव्हा ते आपला रात्रीचा मुक्काम उज्जैनपासून 12 कि लोमीटर दूर असलेल्या कालिया पॅलेसमध्ये करायचे.

भाजपची वेब डिरेक्टरी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हायटेक पद्धत विकसित केली आहे. मोबाइलसाठी वेब डिरेक्टरी बनवण्यात येत असून मुख्यमंत्र्यांपासून सक्रिय कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची तपशीलवार माहिती उपलब्ध होईल. या माध्यमातून कोणताही कार्यकर्ता केवळ एका क्लिकवर पदाधिकार्‍यासोबत संवाद साधू शकेल. यासाठी प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधेची उपलब्धता असावी.


आधीपासूनच खबरदारी
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुक्कामाविषयीची चिंता प्रशासनाला रविवारपासूनच लागली होती. चौहान इंदूरला येऊ शकतात, असा इशारा तेथील अधिकार्‍यांना देण्यात आला होता. उज्जैनमधील चौहान यांची यात्रा दीड तास उशिराने सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभात झा इंदूरमध्येच मुक्काम करणार असल्याचे निश्चित झाले.

छायाचित्रांचे टी-शर्ट
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपतर्फे सर्व आमदार, अध्यक्ष, जिल्हा आणि मंडळ पदाधिकारी, बूथ प्रभारी तसेच सर्व मोठ्या नेत्यांना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट देण्यात येणार आहेत. शिवाय महिलांना साड्या देण्यात येतील. टी-शर्टचा रंग केसरी राहणार असून मागच्या बाजूला कमळाचे फूल काढण्यात येईल.