आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नल यंत्रणा बिघाडामुळे १००० कोटींचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- देशातील मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्टेशनवरील इंटरलॉकिंग सिस्टिम (आरआरआय) १७ जून रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. ही यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी रेल्वेचे तंत्रज्ञ गेल्या महिन्याभरापासून अहोरात्र प्रयत्न करत आहेत. या यंत्रणेची गेल्या दोन दिवसांपासून चाचणी घेण्यात येत आहे. याअंतर्गत १३ तासांत ७५ सिग्नलची रेल्वे अभियंत्यांनी चाचणी घेतली. यंत्रणा सुरळीत होण्यास आणखी कालावधी लागणार आहे. परंतु आतापर्यंत यामुळे विविध गाड्या रद्द कराव्या लागल्याने रेल्वेला १००० कोटींपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागले. रेल्वेने या शॅडो ब्लॉकचा फायदा उचलत ही यंत्रणा पुढील ३० वर्षांसाठी अपडेट केली आहे.

इटारसीतील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे दक्षिण मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, पूर्व िकनारपट्टी व पूर्वोत्तर रेल्वे गाड्या गेल्या महिन्याभरापासून प्रभावित झाल्या आहेत. या बिघाडामुळे आतापर्यंत शेकडो मालगाड्या, पॅसेंजर, एक्स्प्रेस गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ऐनवेळी रेल्वे रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच. त्याचबरोबर रेल्वेला मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे गाड्या रद्द करण्याऐवजी त्यांचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न प्रथम केला जातो. मध्य रेल्वेच्या मुंबईतील अधिकाऱ्यानुसार रोजचे नुकसान अडीच ते तीन कोटींच्या घरात आहे. तिकिटांचा परतावा, नवी सिस्टम, इंजिनिअरिंग, हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भत्ते, भोजन व इतर खर्च लक्षात घेता ही दुर्घटना रेल्वेला िकमान हजार कोटींना पडली आहे.पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायण यांनी सांगितले की, झालेल्या नुकसानीचा अद्याप पूर्णपणे अंंदाज घेणे सुरू आहे.

परंतु एक गाडी रद्द करावी लागल्यास १० - १२ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. दररोज चार ते पाच गाड्या रद्द कराव्या लागल्या. मालगाड्याही रद्द झाल्या. अनेक गाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे होणारे नुकसान खूप मोठे आहे.
सिग्नल यंत्रणेचे ३० वर्षांसाठीचे अपग्रेडेशन
दुर्घटेनपासून धडा घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी इटारसी येथील सिग्नल यंत्रणेचे अपग्रेडेशन केले आहे. हे महत्वाचे जंक्शन असल्यामुळे सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आली असून आता प्रत्येक प्लॅटफॉर्मवर २२ कोचची ट्रेन थांबू शकेल. रुळाजवळील गियर्स, ग्राऊंड कनेक्शन, केबल पॉइंट बदलण्यात आले आहेत. आरआरआय सिस्टम फायरप्रुफ व आधुनिक करण्यात आली आहे.
१६६ किमीची रेल्वे लाइन झाली असती

या दुर्घटनेमुळे रेल्वेला जितके नुकसान झाले त्यातून १६६ किलोमीटरची नवी रेल्वे लाइन तयार झाली असती. एक किलोमीटर रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी ६ कोटी रुपये खर्च येतो.
बातम्या आणखी आहेत...