भोपाळ - सोलापुरातून पकडण्यात आलेल्या सिमीच्या दोन दहशतवाद्यांना मध्य प्रदेशातील न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश तसेच अन्य ठिकाणांहून पकडण्यात आलेल्या सुमारे 32 दहशतवाद्यांच्या संदर्भातील सर्व प्रकरणे भोपाळच्या न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीन व बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट (सिमी) या दहशतवादी संघटनांशी संबंधित अबू फैजल व त्याच्या साथीदारास बडवानी जिल्ह्यात सेंधवा ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण एटीएसने भोपाळकडे वर्ग केले आहे, तर चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात पकडण्यात आलेले सिमीचे सदस्य सादिक अब्दुल व उमेद हाफिज यांना भोपाळच्या न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 24 डिसेंबरला सेंधवा येथील नवलपुरा भागात झालेल्या चकमकीनंतर अबू फैजल व खालीद अहमद (सोलापूर) तसेच महिदपूर येथील इरफान नागेरी यांना अटक केली होती. त्यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य प्रदेश एटीएसच्या आयजींनी दाखल केलेल्या याचिकेबाबत सुनावणी करताना न्यायालयाने सर्व 32 दहशतवाद्यांची प्रकरणे भोपाळ येथे वर्ग केली आहेत. अबू फैजलने चौकशी दिलेल्या माहितीवरूनच सादिक अब्दुल व उमेद हाफिज यांना सोलापुरातून ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडून स्फोटकांचा साठाही जप्त करण्यात आला होता. त्यांना भोपाळच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा ही घटना भोपाळमध्ये घडली नसल्याने त्यांचा ट्रांझिट वॉरंट स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला.
नरेंद्र मोदींच्या सभेआधी एक संशयित ताब्यात
नरेंद्र मोदी यांची रविवारी येथे भव्य सभा झाली. त्याआधी शनिवारी मध्यरात्री रांची पोलिसांनी रेल्वेस्टेशनवर संशयित स्थितीत फिरणा-या एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून तार, बॅटरी व मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. आपले नाव सुखबीर नायक असून कोलकात्याचा राहणार असल्याची माहिती त्या युवकाने सांगितले. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर येथे सिमीकडून घातपात घडवून आणला जाऊ शकतो, असा इशारा गुप्तचर संस्था आयबीने दिला होता.