आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म.प्र. विधानसभेचे अधिवेशन गुंडाळले, सलग तिसरे सत्र मुदतीआधी संपवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- व्यापमं घोटाळ्यावर विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मध्य प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ९ दिवस आधी गुंडाळण्यात आले. बुधवारी विधानसभेतील सूचीबद्ध कामकाज संपल्यानंतर अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले.
कोट्यवधी रुपयांच्या व्यापमं घोटाळ्यावरून अधिवेशन लवकर संपवण्याची ही तिसरी वेळ आहे. या अधिवेशनाआधी अर्थसंकल्पिय व हिवाळी अधिवेशनात पूर्ण कामकाज होऊ शकले नव्हते.
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कामकाजाला सुरुवात होताच बसपाच्या चार आमदारांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. या गोंधळातच विधानसभाध्यक्ष सीताशरण शर्मा यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भाजप आमदार नरेंद्रसिंग कुशवाह यांना बोलण्याची परवानगी दिली. मात्र, बसपा आमदारांच्या घोषणांमुळे संतप्त कुशवाह अध्यक्षांच्या दिशेने गेले आणि त्यांनी विरोधकांकडे पाहून चपलीकडे बोट दाखवले. बसपा आणि काँग्रेस आमदारांनी भाजप सदस्याची कृती अशोभनीय ठरवत पुन्हा गोंधळ घातला. यानंतर संसदीय कामकाजमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मध्यस्थी केल्यानंतर कुशवाह जागेवर जाऊन बसले. यादरम्यान अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर विरोधक-सत्ताधारी आमदारांनी एकमेकांविरुद्ध जोरजोरात आरोप-प्रत्यारोप केले. यानंतर ११.३० पर्यंत पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आले.