भोपाळ - मध्य प्रदेशच्या बडवानीचे जिल्हाधिकारी अजय गंगवार यांच्या
फेसबुक पोस्टवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद अद्याप शांतही झाला नाही तोच रतलामच्या तहसीलदार अमिता सिंह यांच्या पोस्टवरून नवीन वाद उद्भवला आहे. अमिता यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. त्यांनी
आपल्या फेसबुक वॉलवर लिहिले की, पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानला गेले. अफगाणिस्तानात मोदींना सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. मुस्लिम मुलांनी मोदींच्या गौरवार्थ संस्कृत श्लोकांचे उच्चारण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की, पुढच्या वर्षी बजेटच्या दरम्यान त्यांनी ‘राजीव गांधी आत्महत्या योजना’ सुरू करावी. त्यामुळे धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसी विचारधारेचे लोक अशा बातम्या ऐकून आत्महत्या करू शकतील.
अमिताच्या या भडक विधानांमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. माजी आयएएस अधिकारी अखिलेंदू अरजरिया यांनी लिहिले आहे की, आयएएस अधिकारी अजय गंगवार यांनी मोदींविरुद्ध लिहिलेल्या पोस्टला लाइक केल्याने त्यांना पदावरून निलंबित केले होते. राज्य शासनानेदेखील त्यांना नोटीस धाडली. तहसीलदाराची फेसबुक पोस्ट आता समोर आहे. या पोस्टसाठी आता अमिता यांना शासन आऊट ऑफ टर्न बढती देणार आहे काय? यावरही राज्य शासनाने कारवाई केली पाहिजे. अमिता सिंहला आपण व्यक्तिगत आेळखत नाही. पोस्ट वाचून केवळ कॉमेंट केल्याचे अरजरिया यांनी सांगितले.
अरजरियाच्या पोस्टवर कॉमेंट
बढतीची शिफारस केल्याबद्दल धन्यवाद, असा प्रतिसाद अमिता यांनी दिला आहे. मात्र, तुम्ही सेवानिवृत्त आहात. सेवानिवृत्तिवेतन सरकारच देत आहे. मी असे काय लिहिले, ज्यामुळे तुम्ही आक्षेप घेत आहात? सोशल मीडिया अभिव्यक्तीसाठीच आहे. गैर काय? अरजरियांनी लिहिले की, अमिता यांची पोस्ट घटनाबाह्य आहे. त्यांना नोटीस बजावली जावी. भाटगिरी केल्याने पदोन्नती मिळण्याची लालसा असण्याची शक्यता आहे.
माफीही मागितली
आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा संदेश आला होता. तो मी फेसबुकवर शेअर केला. अरजरिया नाहक यावर वाद घडवत आहेत. हे व्यंगात्मक वाटल्याने मी शेअर केला. यावर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. - अमिता सिंह, तहसीलदार, रतलाम