आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vyapam Scam: Today CBI Investigation Decide Supreme Court

व्यापमं : सीबीआय चौकशीचा फैसला सर्वाेच्च न्यायालयात, आज सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर/ उज्जैन/ नवी दिल्ली - सुमारे अडीच हजार आरोपी. दोन हजार लोकांना अटक. केवळ मध्य प्रदेशातील २० न्यायालयांमध्ये दाखल ५५ खटले आणि ४५ हून अधिक लोकांचा मृत्यू. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याच्या भीषणतेचा यावरून अंदाज बांधता येईल. विरोधक सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. सरकारने शिफारसही केली. परंतु जबलपूर हायकोर्टाने बुधवारी या शिफारशीवर सुनावणीस नकार दिला. या मुद्द्यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात निर्णय होईल, असे हाय कोर्टाने म्हटले आहे.

मध्य प्रदेश सरकारने मंगळवारी व्यापमं घोटाळा आणि संबंधित मृत्यूंची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी हाय कोर्टात केली होती. परंतु न्यायमूर्ती माणिकराव खानविलकरांच्या न्यायपीठाने सुनावणीस नकार दिला. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह व व्हिसल ब्लोअर आशीष चतुर्वेदी, जॉ. आनंद राय आणि प्रशांत पांडे यांनी याचिका दाखल केल्या आहेत.

स्वतंत्र न्यायपीठासमोर होणार ‘व्यापमं’ घोटाळ्याची सुनावणी
व्यापमं घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायपीठ स्थापण्यास सर्वोच्च न्यायालय अनुकूल आहे. घोटाळ्यातील एक आरोपी जुबेर अहमदच्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने ही तयारी दर्शवली. न्या. रंजन गोगोई यांच्या न्यायपीठाने जुबेरला व्यापमं प्रकरणी स्थापलेल्या सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या विशेष न्यायपीठासमोर अपील करण्यास सांगितले.

याचिकादाराचे वकील अचानक आजारी
व्यापमं घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी करणा-या जनहित याचिकादारांचे वकील आणि मध्य प्रदेश हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श मुन्नी त्रिवेदी अचानक आजारी पडल्याने बुधवारी ते हाय कोर्टात हजर झाले नाहीत. त्यांना विषबाधा झाली, असा त्यांच्या कुटुंबियांचा संशय आहे. वडिलांच्या ऑफिसमधील टेबलावर मुगवडे ठेवले होते. पक्षकार किंवा कुटुंबियांनी ते आणले असावेत असे समजून त्यांनी ते खाल्ले व आजारी पडले, असे चतुर्वेदी यांच्या मुलाने सांगितले.

चौहान, यादवांच्या राजीनाम्याची मागणी
काँग्रेसने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरील हल्ल्यांची तीव्रता वाढवत त्यांच्या व राज्यपाल रामनरेश यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घोटाळ्यात नाव आलेल्या प्रत्येक व्यक्तीने राजीनामा दिला पाहिजे, किंवा त्याला बडतर्फ तरी केले पाहिजे, असे काँग्रेस प्रवक्ते आर. पी. एन. सिंह म्हणाले.

नम्रताच्या मृत्यूची फेरचौकशी शक्य
व्यापमं घोटाळ्याशी संबंधित इंदूर मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी नम्रता डामोरच्या मृत्यूची फाइल पुन्हा उघडली जाईल. जानेवारी २०१२ मध्ये उज्जैनच्या रेल्वे ट्रॅकवर नम्रताचा मृतदेह आढळला होता. अपघात दाखवून पोलिसांनी तपास थांबवला होता. नवीन पुरावे मिळाल्यास ही फाइल पुन्हा उघडली जाऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.