पानिपत - स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध कायदा असला तरी त्याचे निर्मूलन होण्यासाठी सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केले. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान
नरेंद्र मोदी ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. येत्या दोन वर्षांत स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध जोरदार मोहीम राबवण्यात येणार असून त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
स्त्री-पुरुष प्रमाण समान आढळून येणा-या खेड्याला १ कोटीचे पारितोषिक देण्यात येईल. लिंग विषमता दिसून येणा-या १०० जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात मोहिमेला यश येत असल्याचे दिसून येईल त्यासाठी खास पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. याचे वेळोवेळी मूल्यमापन करण्यात येणार आहे.
स्त्री भ्रूणहत्येची मानसिकता मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग व समाजातील श्रीमंत वर्गात रुजली आहे. ईशान्य भारतातील राज्यात स्त्री-पुरुष प्रमाणात तफावत आढळून येत नाही. जनजाती, आदिवासी भागातही स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण नगण्य असल्याचे मनेका गांधी म्हणाल्या. देशातील संपन्न राज्यातील भागातच हे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला व बालविकास विषयक कार्यशाळेच्या उद््घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. भारताच्या जनगणनेत दर हजार पुरुषांमागे ९१८ महिला असल्याची नोंद आहे. या कार्यशाळेला देशभरातील विविध राज्यांतील १३५ प्रतिनिधी उपस्थित होते.
बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेस २२ जानेवारीपासून प्रारंभ
२२ जानेवारीपासून देशभरातील १०० जिल्ह्यांमधून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना कार्यान्वित होईल. हरियाणातील
सोनीपत येथून गुरुवारी योजनेची सुरुवात होईल व अन्य राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश योजनेत सहभागी होतील. स्त्री भ्रूणहत्या, त्यांच्या जगण्याची सुनिश्तितता, संरक्षण, शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. महिलांप्रती होणारा दुजाभाव आणि हिंसेमुळे स्त्री-पुरुष गुणोत्तरात मोठा फरक जाणवतो. २०११ मध्ये सहा वर्षांखालील १००० मुलांमागे ९१८ मुली असे गुणोत्तर आढळून आले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीकरिता महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.