हैदराबाद - आंध्र प्रदेशमध्ये महिला व बालकल्याणमंत्री पी. सुजाता यांच्या घरी मंगळवारी रात्री दोन पिशव्यांमध्ये १० लाख रुपये आढळून आले. मंत्र्यांनी बॉम्बच्या शक्यतेमुळे पोलिसांना पाचारण केले होते. सुजाता यांचे घर गोदावरी जिल्ह्याच्या वीरासारम तालुक्यात आहे.
सुजाता यांच्याकडे घरकाम करणा-या महिलेने रात्री दोन बॅग पाहिल्यानंतर त्यांना ही माहिती दिली. बॉम्बच्या शक्यतेमुळे मंत्र्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यांना बॅगेत १० लाख रुपये आणि काही दस्तऐवज सापडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. आपली
बदनामी करण्यासाठी हा कट रचला गेल्याचा आरोप सुजाता यांनी केला आहे.
बुधवारी एक ज्येष्ठ महिला विष्णुपतीने बॅगवर दावा केला आहे. मुलीच्या लग्नासाठी बँकेतून पैसे काढले होते. सुजाता यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि बॅग विसरल्याचा दावा महिलेने केला आहे. लाचेच्या रकमेची शक्यता : संबंधित रक्कम शिक्षक भरतीसाठी एखाद्या उमेदवाराने दिलेली लाचही असू शकते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बॅगेत एका उमेदवाराचे प्रवेशपत्रही आहे. जिल्हा निवड समितीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला होता.