आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारपीडित 10 वर्षीय बालिकेने कन्येस दिला जन्म, मामाने 7 महिने केला अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - चंदिगडमध्ये बलात्कार पीडित १० वर्षीय मुलगी गुरुवारी आई झाली. सकाळी सिझेरियन झाले आणि मुलगी जन्मली. सख्ख्या मामाने ७ महिने या बालिकेवर अत्याचार केला होता. डिलीव्हरीनंतर या पीडित मुलीला कन्येचा चेहराही दाखवला गेला नाही. जन्मानंतर लगेच आई-मुलीला वेगळे ठेवण्यात आले. पोटात वेदना होऊ लागल्याने या मुलीस ८ ऑगस्टला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. ११ डॉक्टर तिची काळजी घेत होते.
 
‘बाळाचा सांभाळ तर साेडाच, चेहराही पाहणार नाही’, असे पीडित मुलीच्या पित्याने लेखी कळवले होते. म्हणूनच रुग्णालयात आई-मुलीस वेगळे ठेवण्यात आले. सुटी मिळाल्यावर हे अर्भक बालकल्याण समितीकडे सोपवले जाईल. ही मुलगी दोन महिन्यांची झाल्यानंतर तिला दत्तक देण्याची प्रक्रिया सुरू होईल. बालकल्याण समितीचे अध्यक्ष रॉबर्ट नील यांनी सांगितले, ‘दत्तक देण्याबाबतची सर्व माहिती पीडितेच्या कुटुंबाला कळवली जाईल.’

मुदतपूर्व प्रसूती, वेगवेगळ्या वाॅर्डात अाहेत पीडित मुलगी, बाळ; दाेघींची प्रकृती स्थिर
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, माता व नवजात मुलीची प्रकृती स्थिर आहे. आई झालेल्या बालिकेची प्रकृती सुधारेपर्यंत तिला रुग्णालयात वेगळ्या वॉर्डात ठेवले जाईल. नवजात अर्भकाचा जन्म नऊ महिन्यांपूर्वीच झालेला असल्याने वजन २.२ किलो आहे. काही दिवस हे अर्भक नियो नेटल आयसीयूमध्ये ठेवले जाईल. डॉक्टरांनुसार, गर्भार मुलीचे वय कमी असल्याने तिला नैसर्गिकरीत्या मूल जन्माला घालणे शक्य झाले नसते. प्रसव वेदना सहन करण्याची शक्तीही नव्हती. म्हणूनच ३५व्या आठवड्यातच तिची सिझेरियनद्वारे तिची प्रसूती करण्यात अाली.

धक्का बसू नये म्हणून मुलीला सांगितले, ‘तुला मुतखडा आहे,’... मात्र तिला सत्य माहिती आहे
१० वर्षीय बालिकेस मानसिक धक्का बसू नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने खूप प्रयत्न केले. पोटात मुतखडा आहे म्हणून सांगण्यात आले. मात्र, तिला घडल्या प्रकारानंतर सर्व काही माहिती होती. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या पोटात बाळ असल्याचे म्हटले होते. डिलीव्हरीनंतर पुन्हा ती शाळेत जाऊ लागेल. सध्या ती सहाव्या वर्गात आहे. तिची ओळख पटू नये म्हणून शाळाही बदलली जाईल. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली नव्हती. २८व्या आठवड्यात बालिकेने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यावर गर्भधारणा झाल्याचे निदान झाले होते.

आरोपी मामा, अर्भकाचे डीएनए नमुने तपासणार
बाळाच्या जन्मानंतर पोलिसांनी अत्याचाराचा आरोपी कुलबहादूरला तुरुंगातून तात्पुरते ताब्यात घेतले आहे. त्याचा डीएनए नमुना घेण्यात आला आहे. पीडित बालिका व अर्भकाचेही डीएनए नमुने घेतले. तिघांचे नमुने शुक्रवारी सीएफएसएलला पाठवले जातील. ते जुळले तर आरोपीला कठोर शिक्षेसाठी हा सबळ पुरावा ठरेल.
 
 
बातम्या आणखी आहेत...