आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशालाच चंदन : दरमहा १०० कोटींच्या रक्तचंदनाची लडाखमार्गे चीनला तस्करी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपती - आंध्र प्रदेशातील शेषाचलम जंगलात लाल चंदन विपुल प्रमाणात मिळते. त्याच्या तस्करीवरून आंध्र प्रदेश पाेलिसांंनी केलेल्या एन्काउंटरमध्ये २० लोक मारले गेले होते. ते चंदन तस्कर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. रक्तचंदनाची िकंमत १ कोटी रुपये प्रतिटन आहे. परंतु विदेशात पोहोचल्यावर त्याचे मूल्य दसपटीने वाढते. चीनमध्ये फर्निचरव्यतिरिक्त अणुऊर्जा प्रकल्पांत तसेच लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी औषध म्हणूनही त्याचा उपयोग केला जात आहे.

गेल्या चार वर्षांत रक्तचंदनाच्या तस्करीत दुपटीने वाढ झाली आहे. विदेशात रक्तचंदनाची सर्वात मोठी बाजारपेठ चीनची आहे. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी ५५ चिनी पर्यटकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. चीनमध्ये चंदनाचा वापर फर्निचरसाठी तसेच अणुप्रकल्पांसाठी त्याचा वापर केला जातो. याशिवाय औषधांमध्ये व सौंदर्य प्रसाधनांमध्येही त्याचा वापर केला जातो. जंगलात लाल चंदनाच्या तस्करीमध्ये गेल्या चार वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. हे चंदन कापण्यासाठी आदिवासींचा वापर केला जातो. कारण ते यात निष्णात असतात. चित्तूर येथील वनसंवर्धक रवी कुमार यांनी सांगितले की, पकडल्या गेलेल्या लोकांकडून हे चंदन चीनला पाठवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. मध्य प्रदेशमार्गे लडाख व तेथून ते चीनला
पाठवले जाते.
माफिया करतात आदिवासींचा वापर
तस्कर चंदन कापण्यासाठी आदिवासींचा वापर करतात. एक किलो चंदनाचे लाकूड कापून आणल्यावर त्यांना ५०० ते १००० रुपये मिळतात. प्रत्येकी १० - १० जणांची टोळी करून ते येतात. तीन दिवसांत जवळपास १ टन लाकूड काढून ते गाडीपर्यंत पोहोचवतात. चित्तूरचे सीपीआयचे नेता रामा नायडू यांनी सांगितले की, चंदनाची तस्करी करणारे लोक या मजुरांना आश्वासन देतात की जर तू पकडला गेलास तर रोज हजार रुपये व मारला गेला तर कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले जातील.
चार टप्प्यांत तस्करी
रक्तचंदन तस्करी चार टप्प्यांत केली जाते. पहिला टप्पा लाकूड कटाईचा असतो. चंदन कापून ते ज्या ठिकाणी गाडी लोड होते तिथवर ते आणून देतात. दुसरा टप्पा जंगलातून गाडी बाहेर काढून ती हायवेपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचा असतो. तिसऱ्या टप्प्यात ते वेगवेगळ्या बंदरांपर्यंत पोहोचवले जाते. चौथ्या टप्प्यात समुद्राच्या मार्गे ते विदेशात पाठवले जाते. या साखळीचे वैशिष्ट्य असे की, चारही टप्प्यांतील कामगार एकमेकांना ओळखतदेखील नाहीत. ही माहिती विशेष कृती दल व आंध्र प्रदेश सरकारच्या स्वतंत्र तपासातून हाती लागली आहे. हा अहवाल "दिव्य मराठी नेटवर्क'कडे आहे. यात तस्करांची तसेच या व्यवसायात सहभागी असलेल्यांची एक यादीदेखील आहे.
त्यांच्यापैकी बहुतेकजण फरार असून पोलिसांच्या कक्षेबाहेर आहेत.