आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३० आमदारांचा पाठिंबा, नितीश यांचा सत्तेवर दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/नवी दिल्ली - बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान होणे निश्चित आहे. जदयूच्या शिष्टमंडळाने नितीश यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यासाठी १३० आमदारांची पाठिंब्याची पत्रे राजभवनात दिली. विधानसभा अध्यक्षांनीही नितीश यांना विधिमंडळ पक्षनेते केले आहे. दरम्यान, ‘मांझीची नाव कधीही बुडत नाही,’ अशी टिप्पणी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केली आहे. नीती आयोगाच्या बैठकीवेळी मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन भाजपने पाठिंबा देण्याची गळ घातल्याचे समजते. अर्थात शनिवारपर्यंत मांझींसोबत फक्त ७ आमदार होते. भाजपच्या ९१ आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला तरी बहुमताच्या १२२ च्या आकड्यापासून ते बरेच दूर असतील. दरम्यान,‘आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू. आवश्यकता पडल्यास राज्यपालांसमोर १३० आमदारांची परेडही करू,’ असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

भाजप मात्र फायद्यातच
*२०१०मध्ये ९१ जागा जिंकल्या होत्या. मांझी सोबत आले तर दलित मते पारड्यात.
*नितीश संधिसाधू आहेत, हे पटवून देत बिहारला भक्कम पर्याय देण्याची हमी देणार.
*भ्रष्टाचारावरून लालूंसोबत जाणा-या नितीशविरुद्ध प्रचार.
*लोकसभेत ३१ जागा मिळाल्याने विधानसभेतही फायदा.

नितीश अडचणीत
*बिहारमधील २२ टक्के दलित व्होटबँक दुरावणार. म्हणजेच मोठा फटका.
*नितीश सत्तेबाहेर राहू शकत नाहीत, त्यामुळे सत्तेत परतले असा संदेश जाणार
मांझींचाही तोटा
*बिहारमधील १३ टक्के यादव व्होटबँक नाराज होणार
*भाजपत गेले आणि पक्षाचा विजय झाला तरी पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळेल याची शाश्वती नाही.