आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविवाह नाकारला, मुलीस ठोठावला १६ लाख दंड, वाळीतही टाकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- बालपणी म्हणजे अवघ्या ११ महिन्यांची असताना ठरवलेला विवाह अवैध आहे, असे सांगून तो अमान्य करणाऱ्या युवतीला गावपंचायतीने १६ लाख रुपयांचा दंड ठोठावला तसेच तिच्या कुटुंबीयांना समाजातून वाळीत टाकले. ही घटना जोधपूर जिल्ह्याच्या लुनी तालुक्यातील रोहिचान खुर्द या गावात घडली.

संतादेवी ११ महिन्यांची होती त्या वेळीच तिचा विवाह निश्चित झाला होता. तीन वर्षांपूर्वीच तिला याबाबत माहिती मिळाली होती. ती सध्या महाविद्यालयात शिक्षण घेते. ‘माझ्या निर्णयामुळे सासरची मंडळी संतप्त झाली. हे लग्न कायम ठेवण्यासाठी त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्यास तसेच धमक्या देण्यास सुरुवात केली. दबावाला भीक न घातल्याने पंचायतीने मला १६ लाखांचा दंड ठोठावला तसेच माझ्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात आले,’ असा दावा संतादेवीने केला.
आता या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी संतादेवीने सारथी ट्रस्टकडे मदत मागितली आहे. ट्रस्टच्या विश्वस्त कीर्ती भारती यांनी सांगितले, ‘आम्ही एकीकडे पंचायतीच्या सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहोत, तर दुसरीकडे संतादेवीच्या सासरच्या मंडळींना सल्ला देत आहोत.’

संतादेवीचे वडील गवंडी आहेत. मला माझ्या मुलीला शिकवायचे आहे आणि समाजातील वाईट चाली-रीतींना आळा घालून समाजासमोर एक उदाहरण घालून द्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले.