आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 16 Supporters Of Jayalalitha Committed Suicide In Tamil Nadu, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अम्मांच्या तुरुंगवासाने नैराश्य; सोळा समर्थकांनी केली आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात जाणे भाग पडल्याचा धक्का पचवू न शकल्यामुळे राज्यात शनिवारपासून १६ जणांची आत्महत्या केली. सोमवारी ६५ वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्ते एस. व्यंकटेशन यांनी रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिघांनी फाशी घेऊन आत्महत्या केली, तर आणखी एकाने धावत्या बससमोर उडी घेऊन प्राण त्यागले. राज्याच्या विविध भागांत दहा जणांना हृदयविकाराचा झटका बसला. जयललिता यांच्या बाजूने निकाल न लागल्याने एका जणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या केलेल्यांमध्ये बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोघांनी तिरुप्पूरमध्ये आत्मदहन केले.

ठिकठिकाणी निदर्शने
कोइम्बतूरमध्ये अण्णा द्रमुकचे साधारण २५०० कार्यकर्ते उपोषणास बसले असून १५ कार्यकर्त्यांनी मुंडण केले आहे. अण्णा द्रमुकचे महापौर व पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणपती राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. मदुराईत जयललिता यांना सहानुभूती दाखवत चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली. मेलूरमधील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांतील तासिकांवर बहिष्कार टाकला. थेनी जिल्ह्यात अण्णा द्रमुकच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला. दक्षिण भागातील बहुतांश जिल्ह्यात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पुदुकोत्ताई आणि नागापत्तीनममधील कोळ्यांनी आज मासेमारी केली नाही. तिरुवरूरमधील साधारण १ हजार शेतकरी व व्यापा-यांनी स्थानिक रेल्वेस्थानकासमोर निदर्शने केली.

अम्मांचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या चार वर्षे कैदेच्या शिक्षेला जयललिता यांनी सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले. याशिवाय जामिनासाठी विनंतीही करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत दोषी ठरवण्यात आलेल्या अम्मांच्या सहकारी शशिकला, व्ही. एन. सुधाकरन आणि इलावरासी यांनीही जामीन अर्ज दाखल केले आहेत.

अम्मांसाठी चाहत्यांची निदर्शने, उपोषण
जयललितांना झालेल्या शिक्षेच्या निषेधार्थ तामिळनाडूत ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांनी निदर्शने केली. काही पाठीराख्यांनी सोमवारी उपोषणही केले. २७ सप्टेंबरला जयललितांना शिक्षा जाहीर होताच राज्यात काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली होती. सोमवारी अण्णाद्रमुकच्या महिला आघाडीने एक दिवसाचे उपोषण केले.