आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागाला 18 तास वीजपुरवठा; कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा धडाकेबाज निर्णयांचा सपाटा सुरूच आहे. राज्यातील ग्रामीण भागाला यापुढे १८ तर तालुक्याच्या ठिकाणी २० तास वीज पुरवण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली असून अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.  

बुंदेलखंडसारख्या अत्यंत मागास प्रदेशात वीज पोहोचवण्याचा विडाही सरकारने उचलला आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने २०१९ पर्यंत राज्यातील गावागावांत वीज पोहोचेल, असा संकल्प त्यांनी केला आहे. मंगळवारी यासंदर्भात आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश बजावले आहेत. 

१४ एप्रिल रोजी केंद्र व राज्य सरकार यांच्यात महत्त्वाचा करार केला जाणार आहे. त्यावर आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची स्वाक्षरी होईल. राज्याला पुढील वर्षापर्यंत विजेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.  शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी ग्रामीण भागातील बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर वेगाने दुरुस्त करण्याची सूचनादेखील आदित्यनाथ यांनी दिली आहे.  

...तर अधिकाऱ्यांवर कारवाई
व्हीव्हीआयपी नव्हे तर गरीब घटक सरकारसाठी अधिक महत्त्वाचा आहे. त्यांना चोवीस तास वीज देण्यासाठी काम केले जात आहे. ऑक्टोबर २०१८ पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या काही टप्प्यांत वीज उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा आदित्यनाथ यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...